खंडाळा गावातील विषबाधा झालेल्या बालकाचा मृत्यू

आईपाठोपाठ पाच दिवसांनी चिमुरड्याने घेतला अखेरचा श्वास

भुसावळ : तालुक्यातील खंडाळा येथील महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर महिलेच्या दोघा मुलांनादेखील विषबाधा झाल्याचे समोर आले होते. यापैकी मोठा मुलगा श्रेयस याचा नाशिक येथे उपचार सुरू असताना सोमवारी मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर पाच दिवस मृत्यूसोबत सुरू असलेली श्रेयसची झुंज अपयशी ठरली.

आत्महत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
खंडाळा येथील अश्विनी चौधरी या विवाहितेने घरात कोणीही नसताना बुधवार, 25 ऑगस्ट रोजी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेच्या काही वेळाने तिची दोन्ही मुले अनुक्रमे प्रणव (वय 3) आणि श्रेयस (वय 9) या दोघांना विषबाधा झाल्याचे समोर आले होते. यानंतर त्यांना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तेथे उपचाराअंती प्रणवच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने बुधवारी रात्री सुटी झाली. मात्र श्रेयसच्या शरीरात जास्त प्रमाणात विष भिनल्याने उपचार सुरू होते. येथे त्याच्या प्रकृतीत दोन दिवसानंतर काहीसी सुधारणा झाली होती. मात्र, त्याची प्रकृती अचानक खालावली. यामुळे सोमवारी त्याला जळगावहून नाशिक येथील खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले. तेथे त्याने शेवटचा श्वास घेतला. यानंतर सोमवारी रात्रीच मृतदेह गावी खंडाळा येथे आणून अंत्यविधी करण्यात आले.

घटनेनंतर नाशिक येथे अकस्मात मृत्यूची नोंद
श्रेयसच्या मृत्यूप्रकरणी नाशिक येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तेथून कागदपत्रे आल्यावर भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद होईल. या प्रकरणाच्या तपासात समोर येणार्‍या माहितीनुसार पुढील प्रक्रिया ठरेल, असे पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांनी सांगितले.