खंडाळा गावात अतिक्रमण हटवले

0

भुसावळ । तालुक्यातील खंडाळा येथे शासकीय जमिनीवर काही ग्रामस्थांनी केलेले अतिक्रमण शुक्रवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आले. कारवाईदरम्यान 16 वर्षीय तरुणीने अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थ धावल्याने अप्रिय घटना घडली. दरम्यान, ज्या ग्रामथस्थांचे अतिक्रमण हटवण्यात आले त्यांनी ही कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगत त्या जागेच्या सातबार्‍यावर आपले नाव असल्याचा दावा केला आहे तर प्रशासनाने कारवाई मात्र योग्यच असल्याचे म्हटल्याने पेच वाढला आहे.

कारवाई अन्यायकारक
सूत्रांच्या माहितीनुसार शंकर पाटील, महेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, महाजन, कमलाकर पाटील यांनी केलेल अतिक्रमण हटवण्यात आले तर हे अतिक्रमण अन्यायकारक असल्याची भावना उभयंतांनी व्यक्त करीत संबंधित जागेच्या सातबार्‍यावर आपले नाव असल्याचा दावाही केला आहे.

प्रचंड बंदोबस्तात झाली कारवाई
खंडाळा येथे गोरगरीबांसाठी सहा घरकुले मंजूर असून लाभार्थींना जागा नसल्याने घरकुलांचे काम रखडले होते तर प्रशासनाच्या दाव्यानुसार शासकीय जागेवर काहींनी शेड उभारून अतिक्रमण केल्याने ते शुक्रवारी हटवण्यात आले. कारवाई दरम्यान मोठी झाडे तोडण्यात आली तर शेड उद्ध्वस्त करून संपूर्ण परीसर स्वच्छ करण्यात आला. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरसीपी प्लाटूनचा कडक बंदोबस्त राखण्यात आला. गटविकास अधिकारी सुभाष मावळे, सहाय्यक गटविकास अधिकारी तसेच पंचायत समितीचे अन्य कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

तरुणीचा पेटवून घेण्याचा प्रयत्न
अतिक्रमण काढताना एका 16 वर्षीय तरुणीने अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न मात्र ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत धाव घेतल्याने अप्रिय घटना टळली. घटनेनंतर पोलिसांनीदेखील लागलीच धाव घेतली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात नोंद नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

शासकीय जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याने ते शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आले. मोकळ्या झालेल्या जागेवर लाभार्थींसाठी सहा घरकुलांची उभारणी केली जाणार आहे. नियमानुसार कारवाई करण्यात आली.
-सुभाष मावळे,
गटविकास अधिकारी, भुसावळ