पुणे । पुणे-सातारा महामार्गावरील खंडाळा घाटात एका टेम्पोला सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात 17 मजूर ठार झाले आहेत, तर 13 जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातग्रस्त टेम्पो कर्नाटकहून 35 मजूर घेऊन शिरवळ एमआयडीसीकडे चालला होता. कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील तिकोटा येथून शिरवळच्या औद्योगिक वसाहतीत कामासाठी ते कामगार निघाले होते. मालवाहतूक करणार्या या टेम्पोत (केए-37/6037) 35 पेक्षाही जास्त कामगार दाटीवाटीने बसले होते. खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर नेहमीच्या अपघातग्रस्त एस. वळणावर हा भरधाव टेम्पो उलटला. रस्त्याच्या कडेला बांधलेल्या 6 फुटी कठड्यावरून हा टेम्पो बाहेर फेकला गेला. टेम्पोत बांधकामाचे अवजड साहित्य असल्यामुळे यातील कामगारांना याचा फटका बसला. चार महिला अन् एक मुलगा यांच्यासह सुमारे 17 जण जागीच ठार तर बाकीचे 20 गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये टेम्पो चालकाचाही समावेश आहे.
या अपघातानंतर घटनास्थळी आक्रोश सुरू झाला. दरम्यान याच टेम्पोच्या पाठीमागून येणार्या त्यांच्याच टोळीतील दोघा दुचाकीस्वारांनी तात्काळ ही घटना खंडाळ्याला येऊन पोलिसांना सांगितली. सहाय्यक पोलीस अधीक्षक विजय पवार, खंडाळ्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज हांडे अन् त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना खंडाळ्याच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले. दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली.