खंडाळा येथे मालगाडी रुळावरून घसरली

0

लोणावळा । खंडाळा रेल्वे स्टेशनजवळ मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणारी मालगाडी रुळावरून घसरली. हा अपघात गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडला. मालगाडीचे सात डबे रुळावरून खाली उतरल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक एक्सप्रेस तसेच मेल गाड्या उशिराने धावत होत्या. खंडाळा रेल्वे स्टेशनच्या काही मीटर आधी हा अपघात घडला. मध्य रेल्वेच्या खंडाळा घाटातून डाऊन लाईनने वर पुण्याच्या दिशेने येणार्‍या मालगाडीने खंडाळा बोगदा पार केला. ती गाडी खंडाळा रेल्वे स्टेशनमध्ये शिरत असतानाच मालगाडीच्या मध्य भागात असणारे सात डबे रुळावरून घसरले.

अपघात एवढा मोठा होता की, एका डब्याचे चाके निघून ते रेल्वेच्या मिडल लाईनवर आले. त्यामुळे रेल्वे रूळ आणि स्लीपर्स यांचे खूप नुकसान झाले. तसेच काही ठिकाणी रूळ उखडून गेले. डब्यांच्या धडकेने बाजूला उभा असलेला एक वीज वाहक तारा असलेला खांबदेखील उखडून मिडल लाईनवर पडला. या अपघातामुळे मध्य रेल्वेची मुंबई-पुणे डाऊन लाईन वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाली. तर एक डबा तसेच काही रेल्वेचे स्लीपर्स मिडल लाईनवर पडल्याने ती लाईनही वाहतुकीस बर्‍याच कालावधीसाठी बंद राहिली. रेल्वे विभागाने मिडल लाईनवरील अपघातग्रस्त डबे आणि स्लीपर्स रात्री उशिरा दूर करून ही लाईन सेफ केल्यानंतर मुंबई-पुणे मार्गाने जाणार्‍या मेल आणि एक्सप्रेस पुढे सोडण्यात आल्या. तोवर या मार्गाने जाणार्‍या हैद्राबाद, चेन्नई, सिंहगड या एक्सप्रेस कल्याण, मुंबईकडे माघारी बोलविण्यात आल्या तर काही एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या.