खंडाळे खून प्रकरणात नऊ आरोपींना अटक

0

खडकी : पुर्व वैमनस्यातून महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलासह एकूण नऊ आरोपींना अटक केली आहे. घटनेचा प्रमुख सूत्रधार व आरोपी आकाश चांदणे मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही.

याप्रकरणी शिराज कुरेशी (वय 38), सनी ज्ञानेश्वर तायडे (वय 22), योगेश्वर बालमसुब्रमण्यम पिल्ले (वय 23, सर्व रा. राजीव गांधीनगर खडकी बाजार) व डम्पी उर्फ राँकी फ्रान्सिस मोती (28 रा. खडकी पोस्ट ऑफिसजवळ खडकी) या आरोपीसह पाच अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

भांडणाचा राग मनात ठेवून खंडाळेची हत्या
सोमवारी आरोपी मोती याच्यासह एक अल्पवयीन मुलास अटक केली आहे. तर शिराजसह तीन अल्पवयीन आरोपींना शनिवारी अटक केली होती. रविवारी पिल्ले यासह दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. खंडाळे हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एकूण नऊ जणांना अटक केली आहे. घटनेतील प्रमुख आरोपी आकाश चांदणे व त्याचा सहकारी प्रकाश राठोड मात्र अद्याप फरार असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. लहान भाऊ व मित्रांशी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून शुक्रवारी (दि.31 मार्च) रात्री रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश दत्ता चांदणे (वय 18 रा. महादेव वाडी खडकी बाजार) व त्याच्या दहा सहकारी मित्रांनी पाळत ठेवून योगिराज शिवराज खंडाळे (खंडागळे) या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली होती.

पोलिस ठाण्यासमोरच ठेवला खंडाळेचा मृतदेह
संतप्त खंडाळे कुटुंबीय व खडकीकर नागरिकांनी आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी या करीता खडकी पोलिस ठाण्यासमोरच खंडाळेचा मृतदेह ठेवण्यात आला होता. पोलिस उपायुक्त कल्पणा बारावकर यांनी आरोपींवर कुठलीच दयामया न दाखविता त्यांना अटक करून कडक कारवाई केली जाईल असे आश्‍वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी खंडाळेचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केला.

आरोपी अल्पवयीन असताना त्याच्यावर नऊ गुन्हे
घटनेतील प्रमुख आरोपी चांदणे यांच्यावर खडकी पोलिस ठाणे हद्दीत त्याच्यावर अल्पवयीन असताना एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. तर 18 वय पुर्ण झाल्यानंतर त्याच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुहास भोसले यांनी दिली. मारामारी, तोडफोड, जबर मारहाण, चोरी अशा प्रकारचे गुन्हे चांदणेवर दाखल आहेत. खडकी परिसरात चांदणेची प्रचंड दहशत असून पोलिसांनी आपला खाकी हिसका दाखवून चांदणेची दहशत मोडून काढून त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी येथील त्रस्त नागरिकांनी केली आहे.