खडकी : खंडाळे हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार व आरोपी आकाश चांदणे यासह गुन्ह्यातील त्याचा सहकारी आरोपी प्रकाश राठोड यास खडकी पोलिसांनी मंगळवारी रात्री कर्नाटक येथून शिताफीने अटक केली. या हत्याकांडातील घटनेत पोलिसांनी 13 आरोपींना अटक केली आहे. त्यातील सहा आरोपी हे अल्पवयीन आहेत. योगिराज शिवराज खंडाळे (खंडागळे) या तरुणाचा दिनांक 31 मार्च रोजी रात्री पुर्ववैमनस्यातून आरोपी चांदणे व त्याच्या बारा साथीदारांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर चांदणे व राठोड हे फरार होते. परिमंडळ चारच्या पोलिस उपायुक्त कल्पणा बारावकर, साहाय्यक पोलिस आयुक्त वसंत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास भोसले पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र विभांडीक यांनी सापळा रचून शिताफीने मंगळवारी रात्री घटणेतील प्रमुख आरोपी चांदणे व राठोड यांस कर्नाटक येथून अटक केली.
सहा आरोपी अल्पवयीन
तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक मोहन कालगुडे व पोलिस कर्मचारी बाबा शिर्के, सोपान ठोकळ, गणेश लोखंडे, घुटे आदी पथकाने आरोपी चांदणे आणि राठोड यांचा शिताफीने शोध काढत कर्नाटक बेगंलुरु येथील शाहबादवाडी येथून सापळा रचून अटक केली. आरोपी राठोड हा शाहबादवाडी येथील मावशीच्या घरी लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार तपास पथकातील पोलिसांनी सापळा रचून चांदणे व राठोड यांना अटक केली. आरोपी चांदणे, राठोड यासह शिराज अल्लाउद्दीन अमिर कुरेशी (वय 40) व अरिफ रियाज घोडेस्वार (वय 22) या चारही आरोपींना पोलिसांनी बुधवारी (दि.5.) दुपारी खडकी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. खंडाळे हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 13 आरोपींना अटक केली असून त्यातील सहा आरोपी हे अल्पवयीन आहेत. या पुर्वी पोलिसांनी शिराज कुरेशी, अरिफ घोडेस्वार, योगेश उर्फ बालम पिल्ले, सनी तायडे, डम्पी उर्फ राँकी मोति आणि मंगळवारी चांदणे व राठोड यांना अटक केली.