लोणावळा : राजमाची खंडाळा येथील व्यावसायिकांना राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत सर्वेक्षण करून परवाना मिळावा व त्यासाठी लागणारी जागा मोजून देण्यात यावी. त्याचप्रमाणे सिनेअभिनेते राकेश रोशन व जी.एस.बावा यांच्यासह आर.आय.बी. व एम.एस.आर.डी.सी.च्या कर्मचार्यांवर कारवाई करून खंडाळा राजमाची पॉईंट याठिकाणी चालू करण्यात आलेल बांधकाम त्वरित बंद करण्यात यावे या मागण्यासाठी खंडाळा येथील टपरी पथारीधारकांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
बड्या धेंडांवर कारवाई का नाही
डी.सी.हायस्कूल, राजमाची पॉईंट ते अमृतांजन पॉईंट या भागामध्ये मागील 30 ते 35 वर्षापासून अनेक लोक टपरी, हातगाडीवर चहा, भाजी, वडापाव, मक्याची कणसे विकण्याचा व्यवसाय करीत आहे. अशामध्ये सिनेअभिनेते राकेश रोशन व जी.एस.बावा हे स्वतःची अतिक्रमणे वाचविण्यासाठी सरकारी अधिकारी आणि आर.आय.बी. कर्मचार्यांना हाताशी धरून या पथारी व्यावसायिकांना त्रास देत असल्याचा तसेच येथील हे व्यवसाय आणि राजमाची पॉईंट बंद करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप करीत येथील पथारी व्यावसायिकांनी टपरी, पथारी, हातगाडी पंचायतचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू केले आहे.
आमच्यावरच अत्याचार का?
यावेळी बोलताना बाबा कांबळे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत जोवर देशभरात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नाही तोवर देशातील कोणत्याही फेरीवाल्यावर कारवाई करायची नाही असा निर्णय असताना आणि केंद्र तसेच राज्य सरकारने याबाबत कायदा केला असताना येथील पथारी व्यावसायिकांवर हा अत्याचार का? असा सवाल उपस्थित करीत या सर्वच्या सर्व पथारीधारकांना जोवर न्याय मिळत नाही तोवर आपण लढा देत राहू असे प्रतिपादन केले. खंडाळा येथील राजमाची पॉईंट याठिकाणी करण्यात येत असलेल्या या आंदोलनाला बाबा कांबळे यांच्यासह आर.पी.आय.चे महाराष्ट्र सचिव बाळासाहेब भागवत, टपरी, पथारी, हातगाडी पंचायत, महाराष्ट्रचे जिल्हा अध्यक्ष मल्हारराव काळे, सचिव प्रल्हाद कांबळे, तालुकाध्यक्ष भारत काटे, शहराध्यक्ष गणेश चव्हाण, तळेगाव शहराध्यक्ष किरण साळवे, संदीप रोकडे आदींसह मान्यवर आणि टपरी, पथारीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.