पुणे । चोहिकडे हिरवेगार डोंगर, उंच नारळाची गर्द झाडी, उसाची हिरवीगार शेती, पक्ष्यांचे मंजुळ आवाज, जनावरांचे हंबरण्याचे आवाज आणि त्यांच्या गळ्यातील वाजणार्या घंटा, ओढ्यातून वाहणार्या पाण्याचा खळखळाट अशा प्रसन्न वातावरणात गावातले शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांनी साहित्याचा आस्वाद घेतला. संस्कृतीचा जागर करीत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पहिले शिवार साहित्य संमेलन अजनुज (खंडाळा, सातारा) या गावातील शिवारात नुकताच रंगले.
साहित्य परिषद पोहोचली शिवारापर्यंत
जोशी म्हणाले, साहित्य परिषद ग्रामीण भागापर्यंत, शिवरापर्यंत पोचते आहे ही समाधानाची बाब आहे. साहित्य रसिकांना संमेलनापर्यंत पोचणे शक्य नसेल तर संमेलनांनी त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे. कोकरे म्हणाले, जोपर्यंत शिवारातली माणसं लिहित आहेत, साहित्याचा आनंद घेत आहेत तोपर्यंत भाषेची आणि साहित्याची काळजी करण्याची गरज नाही. शिवारातल्या माणसांनीच आजवर मराठी भाषा टिकवली आहे. पाठ्यपुस्तकात ज्यांचा धडा असूनही ज्यांना पोटासाठी गवंडी काम करावे लागते, असे कराडचे कादंबरीकार शंकर कवळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कविसंमेलन व कथाकथन कार्यक्रम
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा खंडाळा आणि ज्ञानदीप क्रेडिट को-ऑप सोसायटीच्या वतीने विश्वनाथ पवार यांच्या शिवारात या साहित्य संमेलनाचे आयोजन प्रसिद्ध ग्रामीण कथाकार रवींद्र कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी प्रा. मिलिंद जोशी, रवींद्र बेडकिहाळ, विनोद कुलकर्णी, विलास वरे, लेखक शंकर कवळे, जिजाबा पवार उपस्थित होते. कविसंमेलन, कथाकथन असे कार्यक्रम झाले.