भुसावळ। शहरात उन्हाळ्यात झाडांची छाटणी करण्याच्या नावाखाली दिवसभर विद्युत पुरवठा खंडीत केला जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी वर्गाला देखील त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या आठवड्यापासून उकाड्यात आणखीच वाढ झालेली असून उन्हाळ्याचा शेवट हा असह्य होत आहे. अशा स्थितीत शहर व परिसरात विज तारांना स्पर्श करणारी झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे सहा – सहा तास विज पुरवठा खंडीत करण्यात येत असतो. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास अधिक जाणवत असल्याने विज वितरणच्या कारभारमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वेळापत्रक निश्चित करण्याची गरज
वीजमहावितरण कंपनीकडून शहर तालुक्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ट्री कटिंगच्या नावाखाली वीजपुरवठा वारंवार खंडित करण्यात येत आहेे. त्यामुळे प्रचंड उकाड्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर व्यवसायांवर परिणाम होत आहे. संभाव्य धोका पाहता वीज वाहिनी जवळून गेलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम सध्या वीज महावितरण कंपनीतर्फे सुरू आहे. परंतु, या कामास विलंब झाला असून त्यासंदर्भात वेळापत्रक निश्चित नाही. शहरात वारंवार वीजपुरवठा खंंडित होत आहे. ही समस्या शिवाजी नगर, जुना सातारा भागात अधिक वाढली आहे. येेथे केव्हाही वीजपुरवठा खंडित होेेतो. शहरात गेल्या आठवडाभरापासून प्रत्येक भागात विजेचा लंपडाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भारनिमयनाची वेळही निश्चित नाही.
नागरिकांसह व्यापार्यांमध्ये संताप
मागील आठवड्यात शहरात सलग दोन दिवस मध्यरात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने हाल झाले होते. ही समस्या लवकरच सुटावी. दोन दिवसांपासून शहरात खासगी ठेकेदारांच्या मार्फत ट्री कटिंगची कामे सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. महावितरण कंपनीकडून ग्राहकांची पिळवणूक केली जात आहे. कोणत्याही प्रकारे चार ते पाच तास वीज कपात करुन ग्राहकांना त्रास देण्याचे कार्य विज वितरण कंपनीने सुरु केले आहे. कोणत्याच प्रकारची सुचना न देता वीज बंद करण्यात येत आहे. कर्मचार्यांना विचारणा केली असता झाड तोडणे, ट्रान्सफार्मर बदली करणे याचे काम सुरु आहे. असे उत्तर देऊन विज बंद करण्यात येते, एकीकडे उन्हाची मोठ्या प्रमाणात उष्णता वाढत असल्यामुळे घरातील वृध्द व बालकांना याचा त्रास जाणवत आहे. एवढी विज कपात झाल्यानंतरही विज बिलांमध्ये ग्राहकांना दिलासा मिळण्याऐवजी विज बिल वाढवून येते तसेच मागील तीन वर्षात वीज वितरण कंपनीने उभारलेल्या मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास केल्यानंतरदेखील तारा तुटणे, वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे ग्राहक पुरते हैराण झाले आहे.