भुसावळ । शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील कंडारी शिवारातील सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये जूनपासून दररोज किमान चार ते पाच तास वीजपुरवठा खंडीत होत आहे. यामुळे उद्योगांना लागणारा विज पुरवठा खंडीत होत असून वसाहतीमधील तब्बल 60 लघुउद्योजकांचे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे लघु उद्योजक जेरीस आले आहेत. याकडे महावितरणने लक्ष देण्याची गरज आहे.
फिडरवर बिघाड झाल्यास विजपुरवठा केला जातो खंडीत
औद्योगिक वसाहतीमध्ये अॅल्युमिनिअम सेक्शन, स्पन पाईप, बर्फ, प्लास्टिक मेटेरिअरल, ब्रेड, पीव्हीसी पाईप, वायर, प्लास्टिक बॅग, टायर रिमोल्डींग, आटा, रवा, पापड आदींचे उत्पादन करणारे लघुउद्योग आहेत. मात्र सध्या हे सर्व उद्योग खंडीत वीजपुरवठ्यामुळे अडचणीत सापडले आहेत. मे महिन्यात विजेची आवश्यकता असताना अनेक वेळा खंडीत वीजपुरवठ्याचा सामना करावा लागला. यानंतर ते जून दरम्यानही दररोज ते तास वीजपुरवठा खंडीत होत आहे. फिडरवर कोठेही बिघाड झाल्यास सर्वप्रथम वसाहतीमधील वीजपुरवठा खंडीत केला जातो.
मशिनरीचे होतेय नुकसान
यामुळे लघुउद्योजकांचा कच्चा माल मशिनरीमध्ये अडकून नुकसान होते. तसेच बहुमुल्य किमतीच्या डाईज निकामी होतात. यामुळे कारखानदारांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. भुसावळ एमआयडीसीसाठी स्वतंत्र फिडर आहे. मात्र याच फिडरवरुन खडकारोड, खडका चौफुली, वरणगाव रोड, मुस्लीम कॉलनी, संभाजी नगर, लकीभानगर, साकरी आदींची जोडणी करण्यात आली आहे.
समस्या सोडवावी
यामुळे या फिडरवर अतिरिक्त ताण वाढतो. त्यामुळे बिघाड वाढून विजपुरवठा खंडीत होतो. महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा खंडीत करताना माहिती दिली जात नाही. यामुळे कच्चा माल वाचविणे शक्य होत नसल्याची स्थिती आहे. याबाबत वसाहतीने महावितरण कंपनीला पत्रव्यवहार करुन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी ही समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. तसेच महावितरण प्रशासनाने या समस्येची त्वरीत दखल घ्यावी, अशी मागणी आहे. सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये वीजपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र फीडर द्यावे, अशी मागणी उद्योजकांनी महावितरण कंपनीकडे केली आहे.