भुसावळ। उन्हाळ्यात शहरातील नागरिकांना अखंड विजपुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीने विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत. शॉर्टसर्किट होऊ नये, म्हणून विजवहन करणार्या विजतारांना स्पर्श करणार्या झाडांच्या फांद्या तोडणे, ट्रान्सफार्मरची क्षमतावाढ, गार्डनींग लाईन आदींची कामे पूर्ण केली जात आहेत. यामुळे विजग्राहकांना उन्हाळ्यात दिलासा मिळणार आहे.
कमी- अधिक दाबाच्या वीज पुरवठ्याच्या समस्येवर नियंत्रण
उन्हाळ्यात विजेची मागणी वाढते, त्या तुलनेत महावितरणकडून अधिक दाबाने पुरवठा होत नाही. कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे वीज पुरवठा करणार्या यंत्रणेवर ताण येवून तांत्रिक दोष निर्माण होतात. काही ठिकाणी झाडांच्या फांद्यांना स्पर्श करणार्या विजतारांमुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची भिती असते. यामुळे वित्तहानी होण्याचा धोका असतो. मोठ्या अपघातांमुळे प्राणहानीचाही धोका कायम राहतो. तर किरकोळ बिघाडांमुळे वीजपुरवठा खंडीत होऊन ग्राहकांचा रोष पत्करावा लागतो.
उच्चदाब वाहिन्यांना गार्डनींग तारा बसविण्यास सुरुवात
या सर्व संभाव्य अडचणींवर मात करण्यासाठी महावितरण कंपनीने उन्हाळ्याच्या पहिल्याच टप्प्यात उपाययोजना सुरु केल्या आहेत. सध्या शहरातील विविध भागांमध्ये झाडांच्या फांद्याची छाटणी, आवश्यकतेनुसार ट्रान्सफार्मरची क्षमतावाढ, विजेच्या कमी अधिक दाबामुळे विजतारा तुटण्याचे प्रमाण वाढू शकते. यामुळे रहदारीच्या रस्त्यांवर उच्चदाब वाहिन्यांना गार्डनींग तारा बसविणे आदी कामांवर महावितरण कंपनीने लक्ष केंद्रीत केले आहे.
पर्यायी जोडणीने दिलासा
महावितरण कंपनीकडून शहरात राबवण्यात आलेल्या या कामांमुळे आगामी उन्हाळ्यात शहरातील सर्व भागांतील विजपुरवठा सुरळीत राहिल, असा दावा महावितरण कंपनीने केला आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील खंडित वीजपुरवठ्याची समस्या सुटेल.
शहरातील दोन्ही भागांना विजपुरवठा करण्यासाठी सध्या स्वतंत्र सबस्टेशन आहेत. या दोन्ही सबस्टेशनवर पर्यायी विजजोडणीही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तापीनगर सबस्टेशनवर आपत्कालिन स्थितीत विजपुरवठा करण्यासाठी साकेगाव येथून लिंक लाईन टाकण्यात आली आहे. यामुळे पर्यायी जोडणीतून विजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मदत होणार आहे. यामुळे आता उन्हाळ्यात वारंवार खंडीत होणार्या विज पुरवठ्याची समस्या आता कमी होणार असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.