खंडीत पाणी पुरवठ्यामुळे खडकीकरांची पाण्यासाठी वणवण

0

खडकी : चतुर्श्रुंगी पाणीपुरवठा केंद्रातील वॉल्व नादुरुस्त झाल्यामुळे गेल्या दोन दिवसापासून खडकीतील पाणीपुरवठा खंडीत झाला आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा खंडीत झाल्याने खडकीकरांचे पाण्याविना प्रचंड हाल झाले. खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीतील खडकी परिसरास पुणे महापालिकेच्या चतुर्श्रुंगी पाणीपुरवठा केंद्रामार्फत पाणीपुरवठा केला जातो. शुक्रवारी(दि.30.मार्च) दुपारी येथे पाणीपुरवठा करणारा वॉल्व अचानक खराब झाला. त्यामुळे खडकीतील पाणी पुरवठा खंडीत झाला. अशी माहिती होळकर पाणीपुरवठा अधिकारी सुधीर सोनवणे यांनी दिली.

लोकप्रतिनिधींचे झोपेचे सोंग
सध्या कडाक्याचा उन्हाळा असुन पाणी हे जीवनावश्यक आहे मात्र त्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पिण्याचे पाणी विकत घेऊन तहान भागविण्याची वेळ नागरिकांवर आली. तर धुणे भांडे व इतर कामाकरता हातपंपावर धाव घ्यावी लागली. स्थानिक रहिवासियांनी या प्रकरणी लोकप्रतिनीधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता एका सदस्याचा फोन बंद, तर काही सदस्य झोपलेले, अशी परिस्थीती होती. लोकप्रतिनिधीच्या अशा वर्तनाबद्दल येथील एका त्रस्त वकील नागरिकाने तर अशा झोपी गेलेल्या व फोन बंद ठेवणार्‍या सदस्यांना नोटीस बजावत न्यायालयातच त्यांची हजेरी घेतली पाहिजे अशी संतप्त भावना व्यक्त केली. होळकर पाणीपुरवठा अधिकारी सोनवणे यांच्याशी या प्रकरणी संपर्क साधला असता ते म्हणाले कीख् चतुर्श्रुंगी पाणी पुरवठा केंद्रातील पाणी बंद आणि चालु करण्याचा वॉल्व नादुरुस्त झाल्यामुळे सदर पाणी समस्या निर्माण झाली होती. रविवारी दुपारी वॉल्व दुरुस्त करत पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला.