खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी

0

राजगुरुनगर : श्री क्षेत्र निमगाव खंडोबा (ता. खेड) येथे सोमवती अमावस्येनिमित्त कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती. ‘सदानंदाचा येळकोट’, असा जयघोष आणि भंडारा-खोबर्‍याची उधळण करीत श्रींची मिरवणूक काढाण्यात आली. सोमवती अमावस्येनिमित्त सकाळी सहा वाजता खंडोबाची पूजा, अभिषेक करून कुलदेवताच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.

सकाळी दहा वाजता देवाची पालखी वाजत गाजत भीमा नदीवर शाही स्नान करण्यासाठी आणण्यात आली. पालखीची गावामधून मिरवणूक काढून गडावर आणण्यात आली. मिरवणुकीमध्ये ग्रामस्थांसह भाविक सहभागी झाले होते. सोमवती निमित्ताने पुणे जिल्ह्यासह, मुंबई, ठाणे, नगर जिल्ह्यातील भाविकांनी खंडेरायाच्या दर्शनासाठी निमगाव येथे गर्दी केली होती. महोत्सव सुलभ होण्यासाठी जय मल्हार यात्रा कमिटी अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील व सरपंच अमर शिंदे पाटील यांच्या संयोजनाखाली ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.