कृउबाची भिंत पाडल्यानंतर व्यापार्यांचा पत्रपरिषदेत आरोप
जळगाव – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुल बांधण्याला महापालिकेने मनाई केली असून, केवळ बांधकाम व्यावसायिक खटोड बंधूंच्या फायद्यासाठीच सत्ताधारी भाजपा व शिवसेनेने भिंत पाडण्याचा घाट घातल्याचा आरोप दि जळगाव मार्केट यार्ड आडत असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी शनिवारी, पत्रपरिषदेत केला आहे.
जळगाव बाजार समितीने प्रवेशद्वाराला लागून असलेली भिंत शनिवारी पाडली. ही भिंत व्यापार्यांना अंधारात ठेवून पाडण्यात आल्याचा आरोप व्यापार्यांनी केला आहे. यानंतर सायंकाळी बाजार समितीच्या आवारात दि जळगाव मार्केट यार्ड आडत असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी पत्रपरिषद घेतली. यावेळी अशोक राठी यांनी सांगितले की, बाजार समितीने बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुल बांधण्याचा बेकायदेशीर ठराव केला होता. या ठरावाला व्यापारी प्रतिनिधींनी सुरुवातीपासून लेखी विरोध केला आहे. त्यामुळे महापालिकेने परवानगी नाकारली होती. यासंदर्भात व्यापार्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने महामार्ग व बांधकाम विभागाचा अभिप्राय घेण्यास सांगितले होते. असे असतांना खटोड बंधूंच्या फायद्यासाठी भिंत तोडून सर्व्हीस रोड दाखविण्याचा घाट घातला जात आहे. पराग कन्स्ट्रक्शनच्या नावाखाली खटोड बंधूंच्या फायद्यासाठी सत्ताधारी भाजपा व शिवसेनेकडून दबावतंत्राचा वापर होत असल्याचा खळबळजनक आरोप अशोक राठी यांनी केला आहे. पत्रपरिषदेस आडत असोसिएशनचे अध्यक्ष बाळकृष्ण बेहडे, उपाध्यक्ष शशिकांत बियाणी, सुनील तापडिया, व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, उपाध्यक्ष प्रवीण पगारीया, पुरूषोत्तम टावरी, ललित बरडीया, दीपक महाजन, संजय शहा यांच्यासह व्यापारी व शेतकरी उपस्थित होते.
पुढार्यांना मिळणार 30 कोटी रूपये – विजय काबरा
भिंत तोडून व्यापारी संकुल उभारण्यातून पुढार्यांना तब्बल 30 कोटी रूपये मिळणार असल्याचा गौप्यस्फोट व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा यांनी पत्रपरिषदेत केला. यापूर्वीही बाजार समितीने व्यापारी संकुले बांधली पण त्यातून काय साध्य झाले? ते जळगावकरांसमोर आहे. आता पुन्हा नव्याने हा घाट घालून बाजार समिती कर्जबाजारी होण्याची वाट पाहिली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.
सोमवारपासून बेमुदत बंद
बाजार समितीने व्यापार्यांचे हित न जोपासल्याने 10 जून पासून बेमुदत बंद पुकारला आहे. या बेमुदत बंदमध्ये शेतकरी देखील सहभागी होणार असल्याची माहिती अशोक राठी यांनी दिली.
दाणा बाजार असोसिएशनचा पाठींबा
बाजार समितीने योग्य निर्णय न घेतल्यास आडत असोसिएशनच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून दाणा बाजार असोसिएशन देखील दाणा बाजार बंद ठेवणार असल्याची माहिती प्रवीण पगारिया यांनी पत्रपरिषदेत दिली.