खडकदेवळा येथे 65 मेंढ्या दगावल्या

0

मेंढ्यांचे व्हीसेरा नाशिक येथे पाठविणार ; मृत्यू उष्मघाताने की विषारी चारा खाल्याने? कारण अस्पष्ट ; दुष्काळात शेतकर्‍यांचे 5 लाख 20 हजाराचे नुकसान

पाचोरा : तालुक्यातील खडकदेवळा येथे हिवरा धरणात पाणी पिल्यानंतर एका शेतात अचानक संबंधित सर्व 65 मेंढ्या अचानक एकापाठोपाठ दगावल्याची घटना रविवारी सकाळी समोर आली आहे. दरम्यान मेंढ्यांचा मृत्यू उष्मघाताने की विषारी चारा खाल्याने? कारण अस्पष्ट आहे. मेंढ्याचा व्हिसेरा नाशिक येथे पाठविण्यात येणार असून त्या अहवालानंतर नेमके समोर येणार आहे. दरम्यान दुष्काळात तेरावा महिला याप्रमाणे शेतकर्‍याचे 5 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

नगरदेवळा ता. पाचोरा येथील अहिल्या नगर मध्ये राहत असलेल्या लक्ष्मण चिंधा खांडेकर यांचेसह पाच ते सहा कुटुंबातील मेंढ्याचा कळप खडकदेवळा येथील सरपंच शामकांत शेलार यांच्या शेतात मुक्कामी होत्या. दि. 28 रोजी लक्ष्मण खांडेकर यांच्या मुलाचा यवतमाळ जिल्ह्यात विवाह होता. घटनास्थळी मेंढपाळांचे केवळ तीन ते चार लहान मुले असल्याने मेंढ्यांच्या पोटात दोन दिवसांपासुन अन्न पाण्याचा कण नसल्याने दि. 29 रोजी सकाळी 11 वाजता विवाह आटोपुन परत आल्यानंतर मेंढपाळाने शेताच्या बाजुलाच असलेल्या हिवरा प्रकल्पात मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी नेत होते. यादरम्यान 3 ते 4 मेंढ्या पाटचारीत पाय घसरून पडल्या. व याचवेळी इतर मेंढ्या त्यांच्या अंगावर पडल्याने एकमेकांच्या अंगावर पडल्यामुळे व उष्णतेच्या लाटेमुळे लक्ष्मण चिंधा खांडेकर (40), नाना त्रंबक नामदास (08), अंबादास नामदास (06), रमेश खांडेकर (05), किसन साहेबराव बडांगे (04) अशा सुमारे 5 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या 65 मेंढ्या दगावल्या.

शेतकर्‍यांना अश्रू अनावर
गरिब मेंढपाळांचे मोठे नुकसान झाल्याने सर्वच मेंढपाळ कुटुंबीय एक-एक करुन रडायला लागली. तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक महाजन, डॉ. एस.जी. मडावी, डॉ. गौतम वानखेडे , डॉ. सी.बी.परदेशी, डॉ. डी.एन. पाटील यांनी मेंढ्यांचे शवविच्छेदन केले. उपस्थित नागरिकांमध्ये मेंढ्यांनी ज्वारीच्या दुरीचा चारा खाल्यांने विष बाधा झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. डॉ. अशोक महाजन यांनी मेलेल्या मेंढ्यांचे व्हीसेरा नाशिक येथे पाठविणार असुन मेंढ्यांचा मृत्यू उष्मघाताने झाला की विषारी चारा खाल्याने झाला ? हे प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर कळणार असल्याचे सांगितले.