दमदार पावसामुळे धरणसाखळीतील पाण्याचा साठा वाढला
खडकवासला । डोंगर भागासह वरसगाव-पानशेत धरणक्षेत्रात लागोपाठ दोन दिवस दमदार पाऊस पडल्याने पुणेकरांच्या आठ दिवसांच्या पाण्याची भर खडकवासला धरणसाखळीत पडली आहे. खडकवासला धरणसाखळीत 27.34 टीएमसी म्हणजे 93.78 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.
शुक्रवारी सकाळी खडकवासला धरणसाखळीत 83.96 टक्के इतका पाणीसाठा होता. दोन दिवसांच्या पावसाने पाणीसाठ्यात जवळपास 10 टक्के वाढ झाली आहे. शनिवारी सकाळपासून पावसाने उघडीप घेतली आहे. त्यामुळे वरसगाव व पानशेत धरणांच्या सांडव्याचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. मात्र दोन्ही धरणांतून वीजनिर्मिती प्रकल्पाच्या सांडव्यातून पाणी सोडले जात आहे. पानशेत धरणातून 600, तर वरसगाव धरणातून 595 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.
वरसगाव, पानशेत पुन्हा 100 टक्के
जोरदार पावसामुळे वरसगाव (वीर बाजी पासलकर जलाशय) व पानशेत (नरवीर तानाजी सागर) धरणे पुन्हा 100 टक्के भरली. शुक्रवारी दोन्ही धरणांचे बंद दरवाजे उघडण्यात आले होते. दोन्ही धरणांतून येणार्या पाण्यामुळे खडकवासला धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. अद्याप पावसाळी वातावरण कायम आहे. त्यामुळे खडकवासलाही 100 टक्के भरून वाहू लागणार असल्याची शक्यता खडकवासला जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. खडकवासला धरणातून मुठा कालव्यात पूर्ण क्षमतेने 1 हजार 401 क्युसेक पाणी सोडले जात आहे.
टेमघर धरणात 54.68 टक्के पाणीसाठा
वरसगाव, पानशेत धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले असले तरी दोन्ही धरणांतून वीजनिर्मिती प्रकल्पाच्या सांडव्यातून पाणी सोडले जात असल्याने खडकवासला धरणात पाण्याची भर पडत आहे. धरणातील पाण्याची पातळी 93.31 टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. गेल्या 24 तासांत टेमघर येथे 6 मिलिमीटर, तर पानशेत, वरसगाव येथे 5 मिलिमीटर पाऊस पडला. खडकवासला-सिंहगड भागात पावसाची उघडीप आहे. पानशेत, टेमघर, मुठा खोर्यात तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. टेमघर धरणात 54.68 टक्के इतका पाणीसाठा आहे.