‘खडकवासला‘ ओव्हरफ्लो; ‘मुठे’ला महापूर!

0

पुणे/पिंपरी-चिंचवड : पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस पडत असल्याने, धरणाच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली. खडकवासला धरण 100 टक्के भरल्याने शुक्रवारी रात्री 7 वाजल्यापासून मुठा नदीत सुरुवातीला 2000 क्युसेक तर दुपारनंतर 13,981 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पुण्यातील डेक्कनजवळील भिडे पूल पाण्याखाली गेला होता. तर टिळक पुलाजवळ नदीपात्रात अनेक गाड्या अडकल्याने त्या पाण्यावर तरंगत होत्या. नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिलेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरास पाणी पुरवठा करणार्‍या पवना धरणामध्येही 6.997 टीएमसी इतका उपयुक्त जलसाठा झाला होता. तर धरण 85 टक्के भरले होते. धरणक्षेत्रात 1 जूनपासून 1849 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे.

राज्यातील विविध धरणांत जोरदार आवक
मान्सूनच्या सुखद आगमनानंतर सर्वदूर होत असलेल्या पावसामुळे मुंबई, नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर अशा पश्चिम महाराष्ट्रातील मुख्य शहरांना पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमध्ये अत्यंत वेगाने जलवृद्धी होत आहे. मुंबईस पाणीपुरवठा करणार्‍या मोठ्या तलावांसहित भंडारदरा, कोयना, पानशेत, पवना, खडकवासला, चास कमान यांसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील विविध धरणांमध्ये अत्यंत वेगाने पाण्याची आवक होत आहे.

प्रमुख धरणांतून पाण्याचा विसर्ग
खडकवासला धरण साखळीप्रकल्पात 19.15 टीएमसी (65.68 टक्के) पाणीसाठा झाला असून, खडकवासला धरणातून 13 हजार 981 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. पानशेत धरणात 8.66 टीएमसी (81.34 टक्के), वरसगाव धरणात 7.6 टीएमसी (55.05 टक्के) आणि टेमघर धरण 1.45 टीएमसी (39.20 टक्के) पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातील अधिकार्‍यांनी दिली. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आंध्र धरणातून 245 क्युसेक, वडीवळे धऱणातून 4593 क्युसेक, कासारसाई 828 क्युसेक, चासकमान धरणातून 6290 क्युसेक तसेच कालव्यातून 550 क्युसेक, कळमोडी धरणातून 1154 क्युसेक, वडज धरणातून 1473 क्युसेक, केडगाव धरणातून 1022 क्युसेक, तसेच कालव्यातून 1311 क्युसेक, गुंजवणी धरणातून 1873 क्युसेक पाण्याचा विसर्ग कऱण्यात आला आहे.

लोणावळ्यास पावसाने झोडपले
पर्यटकांचे मोठे आकर्षण केंद्र असलेल्या लोणावळ्यासही जोरदार पावसाने झोडपले असून, गेल्या 24 तासांत 220 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. लोणावळ्यात आत्तापर्यंत एकूण 2980 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, भुशी धरणाच्या सांडव्यावरुन आता अत्यंत वेगाने पाणी वाहत असल्याने पोलिसांकडून पर्यटकांना धरणावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

चोवीस तासात धरणक्षेत्रात झालेला पाऊस
खडकवासला 36 मिलीमीटर
पानशेत 120 मिलीमीटर
वरसगाव 118 मिलीमीटर
टेमघर 162 मिलीमीटर