बारामती । बारामती तालुक्यातील पारवडी येथील खडकवासला कालव्यावरील पूल पावसामुळे कोसळला. या पुलामुळे आटोळे ते पानसरे वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. पारवडीकडून आटोळे वस्तीनजीक आहे. या वस्तीवरील व पारवडीतील शेतकरी पानसरेवस्ती व इतर वस्त्यांकडे जाण्यासाठी या पुलाचा वापर करीत होते. या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगण्यात येते. या पुलाला प्लास्टरही करण्यात आलेले नव्हते, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
पानसरे वस्तीकडे तसचे शेतात जाण्यासाठी पारवडीवासीयांना या पुलाचा आधार होता. पूल कोसळ्यामुळे शेतकर्यांची गैरसोय होऊ लागली आहे. या पुलाचे काम स्थानिक ठेकेदाराने केल्याचे समजते. या पुलाच्या दर्जाविषयी गावकरी दबक्या आवाजात चर्चा करताना दिसतात. या ठेकेदाराने ग्रामस्थांना पूल दुरुस्तीचे काम मी बघून घेतो परंतु पुलाविषयी चर्चा करू नका, अशी विनंती केल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. पुलाचे काम चालू असताना सिमेंटचा कमी वापर हाही विषय सुरूच होता. मात्र गावातीलच ठेकेदार असल्याकारणाने फारसा विरोध झाला नाही, असे समजते. हा पुल चांगलाच चर्चेत आला आहे.