खडकवासला धरणप्रकल्पात गेल्या नऊ वर्षांतील सर्वात कमी पाणीसाठा

0

रब्बी हंगाम धोक्यात : इंदापूर, दौंड, बारामतीला शेतीसाठी आवर्तन

पुणे : राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा आणि जिल्ह्यातील शेतीला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरणप्रकल्पात 2015 वगळता गेल्या नऊ वर्षांतील सर्वात कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगाम चांगलाच खडतर जाणार आहे. जलसंपदा विभागातर्फे इंदापूर, दौंड, बारामतीला शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले असून कालव्यातून सुमारे 85 कि.मी.पर्यंत पाणी पोहोचले आहे.

जिल्ह्यातील अनेक भागात दुष्काळी स्थिती असून राज्य शासनानेही 10 तालुक्यांत दुष्काळसदृश्य स्थिती असल्याचे जाहीर केले आहे. यंदा जिल्ह्यातील धरण क्षेत्रात ऑगस्ट महिन्यापर्यंत संततधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे शंभर ट5क्के भरली. परिणामी खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने उजनी धरण 100 टक्के भरले. परंतु, जिल्ह्यातील काही तालुक्यात 40 ते 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील भात पिकांसह, बाजरी, ज्वारी, सोयाबीन आदी पिके जळून गेली आहेत. त्यातच दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्यामुळे तब्बल एक महिना कालव्यातून सोडण्यात आलेला विसर्ग बंद करावा लागला. रविवारी रब्बी हंगामासाठी विसर्ग सोडण्यात आला आहे.

धरणात 25.38 टीएमसी पाणीसाठा

कालवा समितीच्या बैठकीत शेतीसाठी व पिण्यासाठी किती पाणी राखून ठेवावे. तसेच खरीप व रब्बी हंगामासाठी केव्हा पाणी सोडले जावे याबाबतचा निर्णय घेतला जातो. त्यानुसार यंदा 15 ऑक्टोबरपासून रब्बी हंगामासाठी पाणी सोडले जाणार होते. परंतु, सुमारे 15 दिवस कालव्यातून शेतीसाठी विसर्ग सोडण्यास उशीर झाला. त्यातच सध्या खडकवासला धरण प्रकल्पात 2015 नंतर सर्वात कमी पाणीसाठा आहे. 2015 मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी खडकवासला प्रकल्पात 15 ऑक्टोबर रोजी केवळ 16.17 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यंदा 15 ऑक्टोबर रोजी प्रकल्पात 25.38 टीएमसी एवढा साठा शिल्लक होता. 2010 पासून 2018 पर्यंतचा खडकवासला प्रकल्पातील हा सर्वात कमी साठा आहे. 2010 ते 2014 पर्यंत 15 ऑक्टोबर रोजी 26 ते 28 टीएमसीपर्यंत धरणसाठा उपलब्ध होता.

पाणी काटकसरीने वापरावे

मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने 24 मार्च ते 17 जून 2018 पर्यंत कालव्यातून विसर्ग सोडण्यात आला होता. एकाही दिवसाचा खंड न ठेवता सुमारे तीन महिने कालव्यातून विसर्ग सोडण्यात आला होता. परंतु, यंदा पाऊस कमी झाल्याने शेती व पिण्यासाठी काटकसरीने पाणी वापरावे लागणार आहे.