खडकवासला धरणसाखळीत 23.46 टीएमसी पाणीसाठा

0

पुणे : जिल्ह्यात आठवडाभरापासून समाधानकारक पाऊस असल्याने धरणांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. खडकवासला धरणातून 6848 क्युसेक्स तर कालव्यातून 1350 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. खडकवासला धरण साखळीत चांगला पाऊस झाला आहे. शुक्रवारअखेर चार धरणांत मिळून 23.46 टीएमसी साठा जमा झाला आहे. चारही धरणांचा एकूण साठा 80.48 टक्क्यांवर पोहोचला आहे. खडकवासला धरण भरले असून, पानशेत धरण भरण्याच्या मार्गावर आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची मोठी धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. यातील पानशेत 98.68 टक्के, तर पवना धरणात 95.82 टक्के पाणीसाठा झाला आहे.

खडकवासला धरण साखळीतील साठा मुख्यत

शहराला पिण्यासाठी, तर जिल्ह्यातील हवेली, दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 29.15 टीएमसी असून सध्या 23.46 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सध्या धरण क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला आहे. टेमघर धरणक्षेत्रात शुक्रवारी दिवसभरात 35 मि.मी. पाऊस झाला असून, धरणात 51.89 टक्के पाणीसाठा झाला आहे़ वरसगाव धरणक्षेत्रात 22 मि.मी. पाऊस झाला असून धरण 70.60टक्के भरले आहे़ पानशेत धरणक्षेत्रात 22 मि.मी. पाऊस झाला असून धरण 98.68टक्के भरले आहे़

पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड 92.30टक्के, घोड 77.44 टक्के वडज 66.78 टक्के वडिवळे 88.58टक्के , चासकमान 95.64 टक्के, येडगाव 92.41टक्के, गुंजवणी 62.2 टक्के, उजनी 38.90 त्याचबरोबर खडकवासला प्रकल्पातील वरसगाव 70.60टक्के, खडकवासला 100 टक्के, टेमघर 51.89 टक्के आणि पानशेत 98.68टक्के भरल्याने पुणे शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

धरण                   पाणी विसर्ग (क्युसेक्स )
खडकवासला            6848 (1350 कालवा)
पानशेत                 2574
टेमघर                    750
पवना                   1352
भामा आसखेड         3152
घोड                    5200
येडगाव                2942 (1319 कालवा)
वडीवळे                 337
गुंजवनी               1340
उजनी                 1200 डावा कालवा