खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समितीची बैठक संपन्न
मुंबई : खरीप व रब्बी हंगाम 2018-19साठी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून खडकवासला प्रकल्पांतर्गत होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात येईल, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
हे देखील वाचा
आज विधान भवनात खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी,कालवे सल्लागार समितीचे सदस्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या वर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी पुणे जिल्ह्यातील हवेली,दौड, इंदापूर आणि बारामती या चार तालुक्यातील वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे. असे महाजन यांनी या बैठकीत सांगितले.
या बैठकीत खडकवासला प्रकल्प सिंचन क्षेत्र,प्रकल्पीय पाणी नियोजन, सन 2018-19 मधील खरीप हंगामातील सिंचनाचे नियोजन, खरीपासाठीच्या पाणी वापराचे नियोजन / बिगर सिंचनासाठी झालेला पाणी वापर /अपेक्षित पाणी पुरवठा, पुणे महानगरपालिकेचा पाणी वापर, रब्बी हंगामासाठीचा पाणी वापर, सिंचन व्यवस्थापन कामकाजात येणाऱ्या अडचणी, निरा उजवा कालवा अंतर्गत होणाऱ्या पाणी पुरवठा या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.