पिके जळू लागली : पाणीपुरवठा योजना धोक्यात
पुणे : खडकवासला कालव्याचे आवर्तन आले अन् बंद झाले; मात्र तरीही भादलवाडी, पळसदेव, पोंधवडी, मदनवाडी या तलावांत पाणी आलेच नाही. त्यामुळे या तलावात पाणी सोडण्याबाबत दुजाभाव होत असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. प्रत्येक वेळी या तलावात नावापुरते पाणी सोडण्यात येते. यावेळी मात्र खडकवासला कालव्याच्या आवर्तनामधून पाण्याचा एक थेंबही वरील तलावात आलेला नाही. त्यामुळे आम्ही कोणाचे काय केले, असा प्रश्न इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकर्यांनी उपस्थित केला आहे.
चालू वेळी खडकवासला कालव्याचे आवर्तन आले. त्यामुळे तलावात पाणी येईल, अशी शेतकर्यांची अपेक्षा होती, मात्र तलावांमध्ये अद्याप पाणी आलेले नाही. सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. शेतातील उभी पिके जळू लागली आहेत. पाणी नसल्याने पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत.
तलाव पडले कोरडे
गेल्या एक महिन्यापासून दुष्काळाची दाहकता जाणवत आहे. तरीही जलसंपदा विभागाचे अधिकारी व तालुक्याचे लोकप्रतिनिधी याबाबत उदासीन आहेत. संबंधित ग्रामपंचायतीने वेळोवेळी पत्रव्यवहार करूनसुद्धा तलावांमध्ये पाणी आलेले नाही. त्यामुळे वरील सर्व तलाव कोरडे पडले आहेत. सध्याच्या परिस्थितीत तलावात पाण्याचा एक थेंबही नाही. पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. तरीही याकडे कोणीच लक्ष देत नाही. त्यामुळे आम्ही जगावे की मरावे, असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला आहे. भादलवाडी येथील ब्रिटिशकालीन तलावावर चित्रबलाक पक्ष्यांची वसाहत दरवर्षी असते, मात्र यावर्षी पाणी नसल्याने एकही पक्षी आलेला नाही.