खडकी : हॉकीची मायभूमी असलेल्या खडकीमध्ये अद्याप खेळांडूकरिता अॅस्ट्रोटफ मैदानाची उभारणी होऊ शकली नाही, याबाबत आंतरराष्ट्रीय हॉकीपट्टू व प्रशिक्षक धनराज पिल्ले यांनी खंत व्यक्त करीत या मैदानाच्या उभारणीसाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन व शासानाने गतिशील निर्णय प्रक्रिया अंमलात आणावी, अशी भावनाही व्यक्त केली.
रेंजहिल्समधील लष्करी अपंग जवानांच्या पॅराप्लॉजिक सेंटरमध्ये धनराज पिल्ले यांच्या वाढ दिवसानिमित्त रविवारी (दि.16) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पॅराप्लॉजिक सेंटरचे कर्नल मुखर्जी, बोर्डाचे सदस्य मनिष आनंद, पूजा आनंद, मनोज भोरे, कुणाल वेडेपाटील, संदीप मोरे, संतोष देसाई, बंडू चव्हाण, प्रशांत गवळी, अक्षय शिंदे यांसह महाराष्ट्र राज्य तसेच पुणे हॉकी कमिटीतील अनेक मान्यवर आणि लष्करी जवान उपस्थित होते.
पिल्ले म्हणाले, खडकीने बाबू निमल, अजित लाकरा, विक्रम पिल्ले असे नामवंत आंतरराष्ट्रीय किर्तीचे हॉकी खेळाडू देशास दिले. या खेळांडुनी देदीप्यमान कामगिरी करीत देशाचे नाव उंचावले, अशा या खडकीमध्ये अनेक उद्योन्मुख खेळाडु आहेत. मात्र या खेळाकरीता व खेळांडूकरीता अद्याप या भागात अॅस्ट्रोटफ मैदान उपलब्ध होऊ शकले नाही. राज्य शासनाच्या वतीने राज्यातील खेळांडूकरीता योग्य त्या सुविधा व त्यांची दखल घेतली जात नसल्यामुळे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू परराज्यात जात आहेत. खडकीतील आंतरराष्ट्रीय नेमबाज खेळाडू अनिसा सय्यदची दखल हरियानाने घेतली आणि आज ती त्या राज्याचे प्रतिनिधित्व करत आहे. आपल्यालाही याचा कटू अनुभव आला असून गुजरात सरकारने तेथील हॉकी संघाकरीता प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. राज्य शासनाने खेळांडू संदर्भात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सोयी-सुविधा प्रदान केल्यास परराज्यात जाणार्या खेळाडूंचा ओघ कमी होईल, असा विश्वास पिल्ले यांनी यावेळी व्यक्त केला.
पॅराप्लॉजिक सेंटरमधील मुलांना पिल्ले यांनी आपला वाढदिवसानिमित्त अनोखी भेट दिली. या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात इंडोनेशिया येथे आंतरराष्ट्रीय व्हील चेअर बास्केट बॉल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सहा खेळाडू तसेच पॅराप्लॉजिक सेंटर येथील काही खेळाडूंचा या संघात समावेश असून या खेळांडूकरिता पिल्ले यांच्या वतने खेळाचे साहित्य व स्पर्धेत सहभागी होण्याकरिता मुंबई विमानतळापर्यत लक्झरी बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.