खडकीत झोपलेल्या वृध्दास ट्रकने चिरडले

0

खडकी : कडाक्याच्या उन्हामुळे दापोडी येथील रेल्वे पुलाखाली झोपलेल्या वृध्दाला खडी वाहतूक करणार्‍या ट्रकने चिरडले. ही घटना सोमवारी दुपारी घडली. चालकाच्या निष्काळजी व दुर्लक्षामुळे वृध्दाला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर ट्रकचालकाने पळ काढला; मात्र नंतर स्वतःला भोसरी पोलिसांच्या हवाली केले. आसाराम (अशोक) तुकाराम कांबळे (वय 67, ओमकार नगर,काटे वस्ती,दापोडी)असे या घटनेत मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी चालक रमेश शिनवडे घाडगे यांस अटक केली आहे.

अशी घडली घटना
कांबळे हे दुपारी जेवण करून पुलाखाली आले व मित्रा समवेत गप्पा गोष्टी करत ते तेथील मोकळ्या जागेत झोपले. दरम्यान, खडी वाहणारा मालवाहू ट्रक या ठिकाणी वाहन तळाच्या रस्त्याकरिता खडी टाकण्यासाठी आला होता. चालकाने मागील काही एक अनुमान न घेता ट्रक मागे घेत वृद्धास चिरडले. हा प्रकार एकनाथ हाके, दीपक शेरखाने यांच्या निदर्शनास येताच भोसरी पोलिसांना कळविले. नगरसेविका स्वाती काटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पो.नि. नीलेश जगदाळे व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. कांबळे यांचे चिरंजीव दत्ता व मारुती या सहकुटुंबीयांनी अपघाताचे दृश्य पाहून टाहो फोडला. ओमकार नगर, काटे वस्ती परिसरात शोककळा पसरली. कांबळे यांच्या मागे दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. अल्फा लवल येथे ते अनेक वर्ष सेवे मध्ये होते.