खडकी: तीन दिवसांपूर्वी भाऊ व मित्रांसमवेत झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवत येथील अट्टल गुन्हेगार व त्याच्या सहकार्यांनी योगिराज खंडाळे या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या केली. ही घटना शुक्रवार रात्री 11 वाजता आंबेडकर मार्गावरील कॅन्टोन्मेंट कचरा डेपो शेजारी घडली. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना अटक करून कडक शासन व्हावे, या मागणीसाठी संतप्त खंडाळे कुटुंबीय व खडकीकरांनी शनिवारी योगिराजचा मृतदेह खडकी पोलिस ठाण्यासमोर ठेवून रोष व्यक्त केला. परिमंडल चारच्या पोलिस उपायुक्त कल्पना बारावकर यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात घेत अंत्यसस्कार करण्यात आले.
…शुल्लक कारण; जिवानिशी संपवले
योगिराज शिवराज खंडाळे (खंडागळे) असे हत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधारा आकाश चांदणे याच्यासह नऊ जणांविरूद्ध ओमकार अवचिते यांनी खडकी पोलिसात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी संशयाच्या आधारावर शिराज कुरेशी याच्यासह अन्य तीन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे. मयत खंडाळे व त्याच्या मित्रांची तीन दिवसांपूर्वी आरोपी चांदणे याचा भाऊ सागर व मित्र पिल्ले आणि भिंगारे यांच्याशी भांडण झाले होते. त्याचा वचपा काढण्यासाठी चांदणे याने खंडाळेवर पाळत ठेवली शुक्रवारी रात्री त्याच्यावर तलवार, सत्तुर व कोयता असा सशस्त्र हल्ला चढवत निर्घुण हत्या केली. आरोपींनी शुल्लक कारणावरून अत्यंत निर्दयीपणे खंडाळेचा खात्मा केला. कान व डोक्याचे अवयव शरीरापासून वेगळे झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त वसंत तांबे, वरिष्ठ निरिक्षक सुहास भोसले, पो.नि. राजेंन्द्र विभांडीक यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
…चांदणे हिस्ट्रीशिटर
या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार चांदणे याची खडकी परिसरात प्रचंड दहशत आहे. येथील जनसामान्य त्याच्या गुंडगीरीमुळे दहशती खाली वावरतात. बुधवारी आरोपी चादणे याने महादेववाडी येथील एका तरुणावर प्राणघातक हल्ला चढवला, आठ दिवसांपूर्वी डेपोलाईन येथील खाडे नावाच्या तरुणावर चांदणे व त्याच्या साथीदारांनी हल्ला चढवला होता. खडकी पोलिस ठाण्यात आरोपी चांदणे विरूद्ध भांडण, मारामारी, चोरी या सह 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत. मात्र, तो अल्पवयीन असल्यामुळे त्यास न्यायालयातून जामीन मिळत असे. सध्या त्याच्या नावे एक गंभीर व दोन किरकोळ स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती व वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुहास भोसले यांनी दिली.
…खंडाळे कुटुंबाचा आधार निखळला
मयत योगिराज खंडाळे हा आई व लहान भाऊ याच्या समवेत जुना बाजार संगम मित्र मंडळ येथे राहत होता. वडील वारल्याने तो आईस मिळेल ते काम करून हातभार लावीत असे. नुकतीच त्याने 12वी ची परीक्षा दिली होती. येरवडा येथील आय.बी.एम. या माहिती आणि तंत्रज्ञान कंपनीत त्याने दोन दिवसांपूर्वीच मुलाखत दिली होती व तो आज (दि.1 रोजी) कामावार रुजु होणार होता. मात्र, काळाने त्याच्या या स्वप्नावर झडप घातली आणि अशारितीने खंडाळे कुटुंबीयांचा आधार निखळला आहे. पोलिस ठाण्यासमोर त्याच्या आईचा आक्रोश पाहता उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले होते.