खडकी । येथील खडकी कॅन्टोन्मेंटच्या वॉर्ड क्रमांक 1,2, 3 आणि 7मधील सर्व सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्याकडे बोर्ड प्रशासनासहित नगरसेवकांचेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न येथील नागरिकांच्यापुढे उभा ठाकला आहे. नुसते आश्वासनापलीकडे रहिवाशांना काहीच मिळालेले नाही.
सार्वजनिक शौचालय तोडून त्या ठिकाणी ठेकेदारांमार्फत सुलभ शौचालय बनवण्याचा घाट बोर्डाचे अधिकारी व नगरसेवकांनी मिळून बोर्डापुढे मांडला आहे. त्यामुळे या वॉर्डातील जनता मेटाकुटीला आली आहे. सरकारी कामाचा फटका येथील नागरिकांना बसत असून सहा माहिने थांबण्याचा अनुभव येथील रहिवाशांना येत आहे. खडकी बोर्डाच्या वॉर्ड क्रमांक 1 येथे राजीव गांधीनगर, इंदिरानगर, महादेववाडी झेपडपट्टीमध्ये अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी तक्रार करूनही त्याकडे बोर्डाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. वॉर्ड क्रमांक 3 आणि 7 मध्येही दयनीय अवस्था आहे. सुरती मोहोल्ला, डेपो लाईन, दर्गा वसाहत येथील बहुतांश शौचालयांची अवस्था बिकट आहे. अधिकारी, नगरसेवक याकडे कानाडोळा करीत आहेत.
सफाई कर्मचारी हवेत
वर्षानुवर्षे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी या शौचालयांची स्वच्छता करीत होते. मात्र, सध्या बोर्डाच्या हद्दीतील अनेक शौचालये जेटिंग मशीनने नुसते पाणी फवारून स्वच्छ करण्यात येत आहे. स्वच्छता व्यवस्थित होत नाही. घाण तशीच राहते. सफाई कर्मचार्यांची नियुक्ती करावी. तसेच येथील परिसराची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.