खडकीत 15 तास तर बोपोडीत 14 तास मिरवणूक

0

खडकी । ढोल-ताशा, झांज या पारंपरिक वाद्यांच्या दणदणाटात तसेच ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर’ असा जयघोष करीत खडकी-बोपोडीकरांनी मंगळवारी रात्री भक्तिमय वातावरणात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. खडकीत तब्बल 15 तास तर बोपोडीत 14 तास शांततेने ही विसर्जन मिरवणूक पार पडली. ध्वनिप्रदुषणाचे नियम मोडणार्‍या आठ ते दहा मंडळावर कायदेशीर कारवाई अंतर्गत गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती खडकी पोलिसांनी दिली.

एक वॉर्ड, एक विसर्जन मिरवणूक
वॉर्ड क्रमांक सात दर्गा वसाहत येथील सात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी एकत्रित येऊन एक वॉर्ड,एक विसर्जन मिरवणूक ही संकल्पना या मिरवणुकीत राबवित एक सुंदर सामाजिक संदेश दिला. गवळीवाडा मंडळाने ही यंदाच्या वर्षी विसर्जन मिरवणुकीचा खर्च समाजातील गोरगरीब शालेय विद्यार्थांच्या शिक्षणाकरिता खर्च करण्याचा निर्धार करीत साधेपणाची विसर्जन मिरवणूक काढून समाजकार्यास हातभार लावला. श्री विठ्ठल मंदिर देवस्थानच्या वतीने यंदाच्या वर्षी ही गणरायाची पालखी अंतर्गत मिरवणुक काढीत पारंपारीक वाद्याच्या गजरात गणरायाला निरोप दिला.महिलां वर्गाचा मोठा सहभाग हे या मिरवणुकीचे खास वैशिष्टे पुणे पोलिस आयुक्तालयाच्या,विघ्नहर्ता न्यासाच्या, वतिने श्री विठ्ठल मंदिर देवस्थानाचा यावेळी श्रीफळ, पुष्पगुच्छ व एक हजार रुपये देऊन गौरव करण्यात आला. विकास तरुण मंडळ,दी नँशनल यंग क्लब,धोबीगल्ली मित्र मंडळ,राष्ट्रीय तरुण मित्र मंडळ मित्रसागर मंडळ, डेपोलाईन मित्र मंडळ,मिलिट्री डेअरी फाँर्म मंडळ बोपोडी येथे सकाळी 10.45,वाजता विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. महादेव घाट येथे एकूण 38 सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणरायाचे तर औंध रोड येथील छत्रपती शाहू महाराज पक्षी विहार केंद्र येथील शांता आपटे घाटावर 27 गणेश मंडळाच्या गणरायांचे विसर्जन करण्यात आले. रात्री 12.45 वाजता बोपोडीतील उदय विकास मित्र मंडळाच्या शेवटच्या गणपतीचे ढोल-ताशाच्या निनदात विसर्जन करण्यात आले. तब्बल 14 तास चाललेली ही विसर्जन मिरवणूक शांततेने पार पडली. चांदणी चौक येथे एका मंडळाच्या कार्यकर्त्याच्या वतीने मिरवणुक पाहण्यास आलेल्या महिला व मुलींवर गुलालाची उधळण केल्याने महिलांनी रोष व्यक्त केला. पोलिस यंत्रनेनेही याकडे कानडोळा केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

गांधी चौकातून प्रारंभ
खडकीत सकाळी 10 वाजता गांधी चौक येथून विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. नवा बाजार गणाशोत्सव मंडळाच्या गणरायाचे सकाळी 10.30 वाजता महादेव वाडी येथील विसर्जन घाटावर मुळा नदी पात्रात धार्मिक विधीने विसर्जन करण्यात आले. मानाचा पहिला गणपतीचा बहुमान असलेल्या नवी तालीम नूतन तरुण मंडळाच्या गणरायाचे रात्री 10.30 वाजता विसर्जन करण्यात आले. गुलाल व डीजे विरहीत या मिरवणुकीत पांरपरिक वाद्यांच्या निनादात मंडळाने शांततेने आपल्या गणरायास निरोप दिला. मानाचा दुसरा गणपति असलेल्या मधला बाजार मित्र मंडळाच्या गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात रात्री 11 वाजता विसर्जन करण्यात आले.तर मानाच्या तिसर्‍या गणरायाचा बहुमान असलेल्या श्री दत्त मंदिर मंडळाच्या गणरायाचे रात्री 12.45 वाजता धार्मिक व पांरपारीक विसर्जन मिरवणुकीने शांततेने विसर्जन करण्यात आले. खडकी महादेव घाटावर खडकीकरांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मदन पवार,राजू आगरवाल, राजेश शर्मा राजेश काकडे, रवी सोनवाने यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. संगम मित्र मंडळ, माणुस्की मित्र मंडळ यांच्या वतीने महाभंडार्‍याचे आयोजन केले होते. बोपोडी महादेव घाट येथे स्व.चंद्रकांत छाजेड ट्रस्टच्या वतीने आनंद छाजेड यांनी तर शांता आपटे घाटावर नगरसेवक प्रकाश ढोरे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.