गणपती बाप्पा आणि ताबूत एकाच मांडवात झाले विराजमान
31 वर्षानंतर मोहरम आणि गणेशोत्सव हे एकाच कालावधीत
खडकी : यंदा 31 वर्षानंतर मुस्लिम धर्मियांचा मोहरम सण आणि हिंदूंचा गणेशोत्सव एकाच कालावधीत आला आहे. परंतु, कोणत्याही प्रकारची धार्मिक तेढ निर्माण न करता या उत्सवामध्ये दोन्ही समाजाच्या सुजाण नागरिकांनी एक चांगला आदर्श घालून दिला आहे. खडकीच्या बाजार मित्र मंडळ आणि पैलवान ताजिया यांनी एकत्रितपणे दोन्ही उत्सव साजरा करीत बाप्पांची मूर्ती आणि मोहरमचा ताबूत एकाच मांडवात स्थापित करून हिंदू – मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामागील लोकमान्य टिळकांची भूमिका अधोरेखित झाली आहे. यंदा 31 वर्षानंतर मोहरम आणि गणेशोत्सव हे एकाच कालावधीत आले आहेत. खडकी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ बाजार मित्र मंडळ आणि पैलवान ताजिया यांनी एकत्रितपणे दोन्ही उत्सव साजरा करण्याची भूमिका घेतली आहे. या दोन्ही समाजातील बांधवांनी मिळून एकाच मांडवात पहिल्यांदा ‘ताजे’ आणि ‘पंजे’ यांची तर दुसर्या दिवशी वाजतगाजत गणपती बाप्पाची भक्तीभावाने प्राणप्रतिष्ठा केली.
हे देखील वाचा
एकत्र होते दर्शन
पंजेला मुस्लिम समाजात सवारी म्हणतात. याठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येणारे भक्त हे ताजे, पंजे यांचे देखील दर्शन घेतात. तर ताजे आणि पंजे यांचं दर्शन घ्यायला येणारे मुस्लिम बांधवही बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत. हा योगायोग 1986 नंतर आता जुळून आला आहे. 1984, 85,86 या वर्षात तीन ते चार दिवसांच्या फरकाने मोहरम आणि गणेशोत्सव साजरा झाला होता. येणार्या वर्षात देखील तीन चार दिवसांचा फरक असणार आहे. त्यामुळे यंदाचा उत्सव दोन्ही समाजांचे प्रतिनिधित्व करणारा असा खास आहे.
हिंदू-मुस्लीम एकी
एरवी धार्मिक वादातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदाने गणेशोत्सव आणि मोहरम एकत्रितपणे साजरा करीत असल्याने खर्या अर्थाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामागील लोकमान्य टिळकांचा हेतू सफल झाल्याचा प्रत्यय येत आहे. मुठभर लोकांमुळे मुस्लीम समाजाचे नाव खराब होत आहे. हिंदू-मुस्लीम समाजाने एकत्र येऊन असा काही उपक्रम राबवित आहे, ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे. पंजे आणि गणपती बाप्पा यांचे एकत्र दर्शन हिंदू-मुस्लीम एकीमुळे होते आहे.