खडकी परिसरात मुसळधार पाऊस

0

खडकी । गणेशोत्सवादरम्यान विश्रांती घेतलेल्या वरुणराजाने शुक्रवारी (दि.8) दुपारी मुसळधार वृष्टी करीत उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सुखद दिलासा दिला. मागील काही दिवसांपासून शहर परिसरात ऑक्टोबर हिटसारख्या उष्णतेने नागरीक हैराण झाले होते. उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी थंडाव्यामुळे पंखा व कुलरकडे पुन्हा एकदा वळले. हवामान खात्याने येत्या दोन दिवसांत राज्यातील काही भागांसह पुणे व पिपरी-चिंचवड शहरात पुन्हा पावसाचे आगमन होण्याचे संकेत दिले होते.

गुरुवारी रात्री हवामान खात्याचा अंदाज खरा करत शहर परिसरासह खडकी, बोपोडी व दापोडी परिसरात मुसळधार पाऊस झाला. सकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने नोकरदार तसेच शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या निश्‍चित स्थळी जाण्यास अडचण झाली नाही. दुपारी अडीचवाजेपर्यंत कडक उन्ह पडले होते. मात्र काही क्षणातच आभाळ भरून आले व अचानक मुसळधार वृष्टीस प्रारंभ झाला. मुसळधार पावसामुळे सोसायटी परिसरात पाण्याचे तळे साठलेले दृश्य दिसत होते. रस्त्यांवर ही जागोजागी पाण्याचे तळे साठल्याने तसेच खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली. खडकी, बोपोडी व दापोडीतील पथारी व्यावसायिक आणि हातगाडीवर भाजीपाला विक्रेत्यांची यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. बोपोडी वाहतूक थांबा चौकातील सिग्नल बंद झाल्याने काहीकाळ या भागात वाहतूककोंडी निर्माण झाली होती. तासाभराने वाहतूक सुरळीत झाली. साधारपणपणे तासभर पडलेल्या या मुसळधार पावसाने जनजीवन ही विस्कळीत झाले होते. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र यामुळे गारव्याचा एक सुखद अनुभव मिळाला.