खडकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक निलंबित!

0

खडकी : खंडाळे हत्याप्रकरणात खडकी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीसह याच प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतलेला संशयित अशा दोघांनी खडकी पोलिस ठाण्याच्या कोठडीतून रविवारी (दि. 9) पहाटेच्या सुमारास पलायन केले होते. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास भोसले यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आरोपींच्या पलायन प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी सुरू असून, या चौकशीदरम्यान, भोसले यांच्यावर निलंबनाची कुर्‍हाड कोसळली आहे. खंडाळे खूनप्रकरणातील आरोपी सिराज अल्लाउद्दीन अमीर कुरेशी (वय 40, रा. खडकी) व सनी विजय अ‍ॅन्डी (वय 25, रा. धानोरी, विश्रांतवाडी) या दोघांनी रविवारी पहाटे कोठडीच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेतील लोखंडी ग्रीलचे गज कापले. त्यानंतर तारेची जाळी हातांनी उचकटून पलायन केले होते.

दोघे अद्यापही पसारच
खंडाळे खूनप्रकरणातील आरोपी असलेला सिराज कुरेशी हा सराईत गुन्हेगार आहे. खडकी पोलिसांनी त्याला 1 एप्रिल रोजी खंडाळे खूनप्रकरणात अटक केली होती. त्यानंतर सनी अ‍ॅन्डी यालादेखील पोलिसांनी चौकशीसाठी संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. या दोघांना पोलिस ठाण्यातील एकाच कोठडीत ठेवण्यात आले होते. या दोघांनी रविवारी (दि. 9) संधी पाहून कोठडीतून पलायन केले होते. या घटनेनंतर दोघे अद्यापही पसारच आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत असून, ते मिळून आलेले नाहीत, अशी माहिती मिळाली.

अन्य पोलिस कर्मचार्‍यांवरही कारवाई?
पोलिस कोठडीतून दोन आरोपी पळून गेल्याने या प्रकरणाची पोलिस आयुक्तालयाकडून चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात दोषी आढळणार्‍या पोलिस अधिकार्‍यांसह पोलिस कर्मचार्‍यांवरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात सुरुवातीला वरिष्ठ पोलिस निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. त्यानंतर आता पुढील चौकशीत जे दोषी आढळतील, त्यांचेही निलंब अटळ आहे, असेही सूत्रांनी सांगितले.