भुसावळ- तालुक्यातील खडका येथील धांडेवाडा भागातील 78 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिकेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सुलभा सुधाकर चोपडे (78, धांडेवाडा, खडका, ता.भुसावळ) असे मयत वृद्धेचे नाव आहे. चोपडे यांचा मुलगा मुंबईत नोकरीस असून त्या एकट्याच खडका येथे राहत होत्या. शनिवारी रात्री त्या जेवण करून कॉटवर झोपल्या असताना आठ वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्या जमिनीवर पडल्याने त्यांच्या तोंडातून रक्तस्त्राव झाला. शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर रहिवाशांनी तालुका पोलिसांना माहिती कळवली.
खुनाची चर्चा निष्फळ
सुलभा चोपडे यांचा खून करण्यात आल्याची सुरुवातीला जोरदार चर्चा होती. त्यानुषंगाने पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक गजानन करेवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. जळगाव येथून श्वान पथकही पाचारण करण्यात आले मात्र घरातून रोकडसह चिल्लर जशीच्या तशी असल्याने व अन्य साहित्यही जागेवर असल्याने खून झाला नसल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले तर तातडीने मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवून शवविच्छेदन करून अहवाल मागवण्यात आला व त्यातही हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे कारण स्पष्ट झाल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. गिरीश धांडे, सुधीर धांडे, पुष्पा राणे यांच्या उपस्थितीत पोलिसांनी पंचनामा करून तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली.