खडक्यातील युवतीचा जिन्यावरून पाय घसरून पडल्याने मृत्यू

वाढदिवसाच्या दिवशी दुर्घटना : आई-वडीलांनी फोडला टाहो

खडका : शेजारच्यांच्या गच्चीवर वाळात टाकलेले तांदूळ आवरून ते घेऊन लोखंडी जिन्यावरून उतरत असतांना पाय घसरून पडल्याने खडका येथील नेहा सुधाकर कोळी (19) या बारावीतील युवतीचा तिचा गुरूवारी दिवाळी सणाच्या व वाढदिवसाच्याच दिवशी मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली. सुमारे 20 ते 25 फूट उंचीच्या जिन्यावरून ही युवती खाली पडली. डोक्याला मार लागल्याने त्यातच तिचा मृत्यू झाला.

बारावीच्या वर्गात तरुणी घेत होती शिक्षण
खडका येथील सुधाकर कोळी यांची मुलगी नेहा ही गावातील ज्ञानज्योती विद्या मंदीरात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गुरूवारी सकाळी ती शेतात लानी करायला गेली होती, लानीचे काम आटोपून ती घरी आल्यावर शेजारी राहात असलेले दिलीप पाटील यांच्या गच्चीवर त्यांचे तांदुळ वाळत टाकलेले होते. ते तांदुळ आवरून ते घेऊन लोखंडी जिन्याने खाली उतरत होती. त्याच वेळी नेहा हिा पाय घसरल्याने ती जिन्यावरून खाली पडली. जमिनीपासून सुमारे 20 ते 25 फुट उंच हा जीना आहे. जमिनीवर पडल्यावर तिच्या डोक्याला जबर मार लागला. याच वेळी तिच्या कानातून रक्तस्त्राव झाला तर उपचारार्थ हलवत असतानाच तिची प्राणज्योत मालवली. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय तथा हॉस्पीटलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळीपाचला खडका येथे शोकाकूल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आई-वडीलांचा आक्रोश
नेहा हीचा मृत्यू झाल्याची वार्ता कळताच नेहाचे आई-वडील, भाऊ, बहीण यांनी आक्रोश केला. नेहा हिचा गुरूवारी वाढदिवस होता, वाढदिवसाच्या दिवशीच काळाने तिच्यावर झडप घातल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.