जळगाव: राज्याचे जलसंपदा मंत्रीपद जिल्ह्याचे नेते आमदार गिरीश महाजन यांच्याकडे होते. तेंव्हा जिल्ह्यात सिंचनाचे एकही कामे झालेली नाही असे आरोप माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी केले होते. यावर खासदार उन्मेष पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून खडसे हे बदला घेण्याच्या भावनेतून राजकारण करत आहेत. त्यांच्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही असा टोलाही त्यांनी लगावला. बदला घेण्याच्या भावनेतून होणाऱ्या राजकारणाला जिल्ह्यातील जनता कंटाळली आहे. बदला घेण्याचे नाही तर बदल करण्याच्या भावनेतून राजकारण व्हावे. ‘मी-तू’, ‘मी-तू’चे राजकारण सोडून खडसे यांनी विकासाचे राजकारण करावे असेही खासदार उन्मेष पाटील यांनी यावेळी सांगितले.
भाजप कार्यालयात अर्थसंकल्पाविषयी माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते. शहरीसह ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना बळकटी देण्यासाठी या निधीचा उपयोग होणार असल्याचेही खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले. यावेळी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, महेश जोशी, मनोज भांडारकर आदी उपस्थित होते.