जळगाव: पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पराभूत करण्यासाठी पक्षातीलच काही लोकांनी प्रयत्न केले असे आरोप माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केले होते. त्यानंतर काल खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना खडसे यांनी पक्ष चुकले नसून पक्ष नेतृत्व चुकल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. जळगाव जिल्ह्यात देखील भाजपच्या जागा कमी झाल्या यासाठी देखील नेतृत्व जबाबदार असल्याचे सांगून त्यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांना टोला लगावला होता. याबाबत दैनिक जनशक्तीने गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया जाणून घेतली असता खडसे यांच्या आरोपावर गिरीश महाजन यांनी ‘नो कॉमेंट’ म्हणत बोलण्यास नकार दिला.
विधानसभा निवडणुकीची जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर होती. मात्र मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत भाजपच्या जागा घटल्या. विजयाचे जसे श्रेय घेतले जाते तसे पराभवाची जबाबदारी देखील नेतृत्वाने घ्यावे असे सांगत खडसे यांनी गिरीश महाजन यांना टोला हाणला होता. यावर बोलण्यास महाजन यांनी नकार दिला.
जळगाव येथे भाजपच्या उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची ७ डिसेंबर रोजी बैठक आहे. या बैठकीत जिल्ह्यातील पराभूत जागांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आढावा घेणार आहे. खडसे यांनी केलेल्या तक्रारी संदर्भात देखील ते माहिती घेणार आहे. जिल्ह्यात रोहिणी खडसे यांच्यासहित भाजपच्या उमेदवारांच्या पराभवाच्या कारणांवर यावेळी चर्चा होईल, त्यातून सगळे समोर येईल असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.