खडसेंच्या जाण्याने भाजपला काही फरक पडत नाही: गिरीश महाजन

0

जळगाव: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने भाजपला मोठी खिंडार पडणार, जळगावसह उत्तर महाराष्ट्रात भाजपला हानी होईल अशी चर्चा सुरु आहे. मात्र माजी मंत्री गिरीश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जनता पक्ष हा विचारांवर चालणारा पक्ष आहे, कोणाच्या जाण्याने पक्षाला काही फरक पडत नाही. खडसे यांच्या जाण्याने भाजपला फार नुकसान होईल असे वाटत नाही असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगरमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. याठिकाणी ते कायम राहणार आहे. खडसे यांच्यासोबत पक्षातील कोणीही आमदार, खासदार किंवा बडे नेते गेलेले नाही आणि जाणारही नाही त्यामुळे खडसेंच्या जाण्याने पक्षाला फार फरक पडणार नाही असे महाजन यांनी सांगितले. जळगाव शहरातील भाजप कार्यालयात पक्षाची बैठक झाली, त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.