मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना गेल्या आठवड्यात जमीन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केली होती. त्यांच्या कोठडीत आता वाढ करण्यात आली आहे. आता १५ जुलैपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे.
ईडीच्या आरोपानुसार २०१६मध्ये खडसे महसूलमंत्री असताना पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीच्या मालकीचा भूखंड गिरीश यांच्या नावे विकत घेतला गेला. याप्रकरणी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ईडीने खडसे कुटुंबीयांविरोधात गुन्हा नोंदवला होता. डिसेंबर महिन्यात ईडीने खडसे यांना समन्स जारी करत चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. खडसे जानेवारी महिन्यात ईडीसमोर हजर झाले. त्यांची सहा तास चौकशी करण्यात आली होती. या व्यवहारासाठी खडसे यांनी आपल्या पदाचा व अधिकारांचा गैरवापर केला, असा आरोप त्यांच्यावर आहे. या भूखंडाचा बाजारभाव ३१ कोटी रुपये असताना खरेदी व्यवहाराच्या नोंदीनुसार गिरीश यांनी तो ३.७५ कोटी रुपयांना विकत घेतल्याची नोंद आढळते. हा भूखंड इतक्या कमी किमतीस कसा विकत घेतला आणि तो विकत घेण्यासाठी गोळा केलेल्या रकमेचा स्रोत काय, या मुद्दय़ांवर ईडीने तपास सुरू केला. गिरीश यांनी चौकशीदरम्यान काही कंपन्यांकडून कर्ज घेतले असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात ही रक्कम बोगस कंपन्यांद्वारे वळविण्यात आल्याची माहिती तपासातून हाती आल्याचे ईडीने सांगितले. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आणखी काही लोकांचे जबाब नोंदवण्याचं काम सध्या सुरु आहे आणि चौधरी यांची आणखी चौकशी करणं गरजेचं आहे, असं ईडीने न्यायालयाला सांगितलं. आता १५ जुलैपर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.