जळगाव – भाजपाचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. आज मुंबई येथे पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खडसेंच्या प्रवेशाविषयी चर्चा झाली. मात्र या प्रवेशाबाबत जळगाव जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांमध्ये काही जण सकारात्मक आहेत तर काही नकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान खडसेंच्या प्रवेशामुुळे कोणकोणत्या मतदारसंघांवर प्रभाव पडू शकतो याविषयी पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांकडून चाचपणी करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी ‘दै. जनशक्ति’शी बोलतांना दिली. सन २०१४ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता खेचून आणण्यात मोलाचा वाटा राहीलेले भाजपाचे माजी मंत्री एकनाथराव खडसे हे सध्या बंडाच्या पावित्र्यात आहेत. बीड येथे पंकजा मुंडे यांच्या झालेल्या मेळाव्यात ‘माझा काही भरवसा नाही’ असे सुतोवाचही केलेच होते. भाजपच्या सत्ताकाळात कथित आरोपांमुळे मंत्रीपद गेल्यापासून एकनाथराव खडसे भाजपावर नाराज आहेत. ज्या-ज्या वेळी संधी मिळेल त्या-त्या वेळी खडसेंनी पक्षनेतृत्वावर टिकेची झोड उठविली. राज्यातही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचे शितयुध्द सुरूच होते. आता तर खडसे यांनी फडणवीसांवर उघड आरोप आणि टिकाही केली आहे. त्यामुळे खडसे पक्ष सोडून राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा होत आहे.
राष्ट्रवादीकडून चाचपणी
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी खा. पवार यांनी खडसेंचे समाधान होइल एवढी साधन सामग्री माझ्याकडे नसल्याचे वक्तव्य केले होते. आता मात्र वेळ आणि काळ बदलला आहे. खडसेंच्या प्रवेशासह जळगाव जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न, राजकीय परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी आमदार अरूणभाई गुजराथी, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार दिलीप वाघ, दिलीप सोनवणे, संजय गरूड, जि.प.चे गटनेते शशीकांत साळुंखे आदी उपस्थित होते. बैठकीत खडसेंच्या प्रवेशाची चाचपणी करण्यात आली. जिल्ह्यातील स्थानिक काही नेत्यांनी या प्रवेशाला सकारात्मकता तर काहींनी नकारात्मकता दर्शविली आहे. खडसेंच्या येण्यामुळे कुठल्या मतदारसंघावर नेमका कसा प्रभाव पडेल? याचाही आढावा घेण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी दिली. त्यामुळे खडसेंच्या प्रवेशाबाबत स्थानिक नेत्यांमध्ये अद्याप एकमत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
खडसेंबाबत चर्चाच नाही- माजी मंत्री
मुंबई येथील राष्ट्रवादीच्या बैठकीत जिल्ह्यातील सिंचनासह राजकीय परिस्थीतीविषयी आढावा घेण्यात आला. खडसेंच्या प्रवेशाबाबत कुठलीही चर्चा झालीच
नसल्याची माहिती माजी मंत्री गुलाबराव देवकर व डॉ. सतीश पाटील यांनी दिली.