खडसेंच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलले

0

भुसावळ । भुसावळ पालिकेनंतर राज्याच्या पटलावर चर्चेत आलेल्या वरणगाव नगरपालिकेच्या बहुचर्चित नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आजी-माजी मंत्र्यांनी आपल्या गटाच्या उमेदवाराची वर्णी लावण्यासाठी डावपेच आखल्यानंतर प्रत्यक्षात निवडणुकीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला तर नाथाभाऊंचा झेंडा तब्बल 25 वर्षांपासून मिरवूनही प्रत्यक्षात पदाची संधी न मिळाल्याची भावना झालेल्या व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या गटाशी सलगी ठेवून असलेल्या सुनील काळे यांनी सेना-भाजपा-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच टेकू घेत सत्तेचा सोपान पार केल्याने वरणगाव पालिकेत ‘कमळ फुलले मात्र महाजन गटाचे’, असे म्हणण्याची वेळ आली. राजकीय कुरघोड्यांनी चर्चेत आलेल्या या निवडणुकीचे आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात पडसाद उमटणार असल्याचे राजकीय विश्‍लेषकांना वाटते. शह-काटशहाच्या राजकारणातून पार पडलेल्या निवडणुकीत अपक्ष नगरसेवक शेख अखलाक यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह वरणगावकरांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरत विजेत्यांचे स्वागत केले. ‘भाजपा विरुद्ध भाजपा’ उमेदवार षड्डू ठोकून उभे असताना व भाजपाच्याच उमेदवाराचा येथे विजय झाला असताना आगामी काळात ‘गटनेता नेमका अधिकृत कोण’ व ‘व्हीप नेमका झुगारला कुणी’ या कारणावरून भाजपाच्या नगरसेवकांमध्ये कुरघोड्या होवून गुंता वाढण्याची व पुन्हा समीकरणे बदलण्याची शक्यता अधिक आहे.

सेना-राष्ट्रवादीच्या टेकूने सुनील काळेंना मिळाली संधी
18 सदस्य असलेल्या वरणगाव पालिकेत जागेने भाजपा तुल्यबळ पक्ष होता मात्र भाजपातील गटबाजी उफाळल्याने सुनील काळे यांनी स्वतःलाच मतदान करण्याचा व्हीप बजावला तर दुसरीकडे रोहिणी जावळे यांनीही दावेदारी दाखल करीत खळबळ उडवून दिली होती. निवडणुकीच्या आदल्या दिवशी पाच नगरसेवकांनी गटनेता बदलाची नोंद जिल्हाधिकार्‍यांकडे करून सुनील काळे यांना शह दिला तर प्रत्यक्षात पालिका सभागृहात हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानप्रसंगी भाजपाच्या रोहिणी जावळे यांना त्यांच्या स्वतःच्या मतासह जागृती सुनील बढे, विकीन भंगाळे, अरुणा इंगळे, गटनेता नितीन निवृत्ती माळी तर अपक्ष नगरसेवक वैशाली देशमुख व अपक्ष नगरसेवक योगेश धनगर यांनी मतदान केले तर सुनील काळे यांना त्यांच्या स्वतःच्या मतासह अपक्ष नगरसेवक शेख अखलाख शेख युसूफ व मेहलाज बी.पिंजारी, शिवसेनेचे शशी संजीव कोलते तर राष्ट्रवादी प्रतिभा समाधान चौधरी, राजेंद्र विश्‍वनाथ चौधरी, विष्णू नेमीचंद खोले, गणेश सुपडू चौधरी, रवींद्र सोनवणे, भाजपाच्या नसरीन बी.साजीद कुरेशी, माला मिलिंद मेढे यांनी मतदान केल्याने काळेंची नगराध्यक्ष पदावर वर्णी लागली. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही भाजपाच्या गणेश धनगर यांना सात तर अपक्ष नगरसेवक शेख अखलाक यांना 11 मते मिळाल्याने शेख अखलाख यांची उपनगराध्यक्ष पदावर वर्णी लागली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर होते तर मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, गंभीर कोळी , संजर माळी आदी कर्मचार्‍रांनी त्यांना सहकार्य केले.

मंत्री गिरीश महाजनांचे वरणगावात वर्चस्व !
खडसे-महाजनांचे ‘सख्य’ संबंध जिल्हावासीयांना ठावूक असतानाच वरणगावात महाजनांनी लक्ष घातल्याने ही निवडणूक माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार संजय सावकारे यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती. निवडणुकीच्या एक दिवस आधीच खडसे गटाने थेट गटनेते असलेल्या सुनील काळे यांना डच्चू देत नितीन माळी यांची वर्णी लावून रोहिणी जावळेंच्या नावाचा व्हीप जारी केला होता मात्र महाजन यांनी आपले डावपेच वापरात त्यांचे खंदे समर्थक व भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरींवर जबाबदारी सोपवत राष्ट्रवादीचे राजेंद्र चौधरी यांना माघार घ्यावयास लावून भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनाच शह दिल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी व अपक्षांची मोट बांधत सुनील काळे नगराध्यक्षपदी विराजमान झाले तर आजी-माजी मंत्र्यांसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीत जलसंपदा मंत्री महाजन यांचे वर्चस्व सिद्ध झाल्याने आगामी जिल्ह्यातील राजकारण कुठल्या रंजक वळणावर जावून पोहोचत याकडे राजकीय समीकक्षांच्या नजरा लागल्या आहेत.

महाजनांच्या रथाचे सारथी ठरले ‘चौधरी’
वरणगाव पालिकेत भाजपाच्या मात्र महाजन गटाच्या सुनील काळे यांना पदावर विराजमान करण्यासाठी माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी मोलाची कामगिरी बजावली अर्थात महाजनांच्या रथाचे ते ‘सारथी’ वा दूत बनले, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. राष्ट्रवादीच्या राजेंद्र चौधरींशी असलेली घनिष्ठ मैत्री व चौधरींनी टाकलेल्या शब्दाखातर राष्ट्रवादी पालिकेत बॅक झाल्याने काळेंचा मार्ग सुकर झाला तर अपक्षांची मोट बांधून भाजपाच्या दोन नगरसेवकांना फोडण्यात काळेंना यश आले. सेनेच्या जिल्हाध्यक्षांनी नगरसेवक शशी कोलते यांना ‘तटस्थतेचा’ व्हीप जारी केल्यानंतरही त्यांनी काळेंना हात उंचावून मतदान केले. शिवसेना जिल्हाप्रमुखांची भूमिका आगामी काळात काय असेल ? वा ते चौधरींशी ‘मैत्री धर्म निभवतात’ हेदेखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. वरणगावातील राजकीय समीकरणे बदलण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या अनिल चौधरी यांनी महाजन गटाचे वरणगावात वर्चस्व वाढवून थेट खडसे गटाला धक्का दिल्याने भाजपातील राजकारण ढवळले आहे. तालुक्याच्या पटलावर चौधरींचे वजन वाढू लागले आहे, असे म्हणण्यास हरकत नसावी !

वरणगावकरांनी अनुभवला प्रचंड बंदोबस्त
वरणगाव ग्रामपंचायतीला पालिकेचा दर्जा मिळवून देण्यात महत्त्वाची माजी मंत्री खडसे यांची आग्रही भूमिका होती वा त्यांच्या प्रयत्नातून ते शक्य झाले. मंगळवारच्या निवडणुकीसाठी कधी नव्हे तो इतका बंदोबस्त वरणगावकरांनी अनुभवला. पोलीस उपअधीक्षक सुभाष नेवे रांच्रा मार्गदर्शनाखाली वरणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी, हेमंत कडूकार, उपनिरीक्षक नीलेश वाघ, कॉन्स्टेबल सुनील वाणी, नागेंद्र तायडे, कुलकर्णी, येवले यांच्यासह मुक्ताईनगर व बोदवड रेथील पोलिसाचा कडेकोट बंदोबस्त होता.

सुनील काळेंचा शहरवासीयांतर्फे सत्कार
वरणगावचे नूतन नगराध्यक्ष सुनील काळे यांचा निवडीनंतर पदाधिकारी, कार्यकर्ते, हिंतचिंतक तसेच वरणगाव शहरातील नागरीकांतर्फे सत्कार करण्यात आला.

पोलीस बंदोबस्तात धडकले नगरसेवक
सुनील काळे यांना नगराध्यक्ष पदाचा मुकूट मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणार्‍या सेना-राष्ट्रवादी-भाजपाच्या 11 सदस्यांना पोलीस बंदोबस्तात तीन वाहनांद्वारे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी पालिकेपर्यंत आणले. हे चित्र पाहताच राजकीय समीक्षकांच्या भुवया उंचावल्या नसतील तर नवलच !

पराभव दिसताच उठले नगरसेवक
माजी मंत्री खडसे गटाचा पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने भाजपाच्या पाच नगरसेवकांसह अन्य दोन नगरसेवक सभागृहातून बाहेर पडण्यासाठी उभे राहताच प्रांताधिकार्‍यांनी प्रक्रिया पूर्ण होईस्तावर थांबण्याच्या सूचना केल्याने सदस्यांना पुन्हा खाली बसावे लागले.

भाजपाच्या खडसे गटाने सुनील काळेंना ठरवले बंडखोर
वरणगाव पालिकेत भाजपाच्या सुनील काळेंची नगराध्यक्षपदी वर्णी लागली असलीतरी खडसे गटाने मात्र काळेंना भाजपाचे बंडखोर म्हणून उपाधी दिली आहे तर ते आता भाजपाचे नसून राष्ट्रवादीचे झाल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यासह अपात्रता करण्याबाबत कार्यकर्त्यांसह नेत्यांनी सूर आळवला आहे. आगामी राजकारण रंजक असणार आहे.

भुसावळ पॅटर्नची पुनरावृत्ती
भुसावळ पालिकेत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी उभी ठाकल्याने व भाजपा नगरसेवकांनी व्हीप झुगारून इतिहास घडवला तीच पुनरावृत्ती येथे झाली.

सुनील काळे आज जे काही आहेत ते नाथाभाऊंमुळेच आहेत. पक्षाच्या आठ पैकी पाच व दोन अपक्षांनी मतदान केले मात्र काळे यांनी बंडखोरी करून राष्ट्रवादीची मदत घेतली त्यामुळे ते आता भाजपा बंडखोर असून त्यांना अपात्र करण्यासंदर्भात प्रस्ताव दाखल करण्यात येईल. माजी मंत्री गिरीश महाजन यांचा वरणगावशी कुठलाही संबंध नाही.
-एकनाथराव खडसे, माजी महसूलमंत्री

सुनील काळे यांनाच आम्ही भाजपा उमेदवार म्हणून संधी देणार होतो मात्र त्यांनी अविश्‍वास दाखवला व व्हीप काढला. राष्ट्रवादीचा टेकू घेत ते नगराध्यक्ष झाले ही बाब त्यांच्या पक्षनिष्ठेतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करते. माघारीच्या अखेरच्या दिवशी त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार होते मात्र त्यांनी कुणाचेही ऐकले नाही. त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
-संजय सावकारे, आमदार

आपण भाजपाचे 25 वर्षांपासून निष्ठावान कार्यकर्ते म्हणून काम केले आहे व यापुढेही कुठल्याही पदाची लालसा न बाळगता करीत राहणार आहे. वरणगाव शहराचा विकास हाच ध्यास आता आपल्याला आहे. सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन आपण चालणार आहोत. कुणी आपल्यावर मंत्री महाजन गटात सहभागी झाल्याचा आरोप करीत असेल तर मंत्री गिरीश महाजन व अनिल चौधरी हेदेखील भाजपाचे निष्ठावान आहेत हेदेखील तितकेच खरे ! पदावर विराजमान होण्यासाठी पक्षाच्याच नेत्यांनी मदत केली तर त्यात गैर ते काय?
-सुनील काळे, नूतन नगराध्यक्ष, वरणगाव

लोकनेते नाथाभाऊ व आमदार संजय सावकारे व पक्षश्रेष्ठींनी रोहिणी जावळेंनाच अधिकृत उमेदवार घोषित केले होते. वरणगाव पालिका निवडणुकीत भाजपा बंडखोराचा विजय झाला आहे. भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार रोहिणी जावळे होत्या. भाजपाच्या पाच सदस्यांनी व दोन अपक्षांनी त्यांना मतदान केले. या उलट राष्ट्रवादीच्या व शिवसेनेच्या अभद्र युतीमुळे भाजपा बंडखोराचा विजय झाला आहे. भाजपा बंडखोरांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे. त्याचा आम्ही विचार करीत आहोत व या बंडखोरांना अपात्र करण्याचा प्रस्ताव स्थानिक कार्यकर्त्यांकडून आला आहे.
-प्रा.सुनील नेवे, जिल्हा सरचिटणीस

भाजपाच्या अधिकृत उमेदवार रोहिणी जावळे होत्या मात्र बंडखोर उमेदवार सुनील काळे यांनी राष्ट्रवादी व सेनेशी अभद्र युती करीत यश मिळवले. गटनेते नितीन माळी यांनी अधिकृत व्हीप रोहिणी जावळेंच्या नावाचा काढला असताना तो झुगारणार्‍यांवर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यात येईल. पक्ष विरोधात काम करणार्‍यांविरोधात कारवाईची मागणी आम्ही करणार आहोत.
-सुधाकर जावळे, तालुकाध्यक्ष भाजपा