मुंबई: काल भगवान गडावर भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जोरदार भाषण करत भाजप आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीर टीका केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केल्याचे आरोप खडसे यांनी केले होते. यावर आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. एकनाथराव खडसे हे काय बोलले त्याच्यावर मी भाष्य करणार नाही, मात्र खडसे जे बोलले ते बोलायला नको होते असे सांगितले. खडसे यांनी जयंतीच्या व्यासपीठावर राजकीय भाष्य केले मात्र ते राजकीय भाष्य करण्याचे व्यासपीठ नव्हते, खडसेंनी त्या व्यासपीठावर तसे भाषण करणे योग्य नव्हते असे फडणवीस यांनी सांगितले. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यात खडसे यांच्या विधानावरून देवेंद्र फडणवीस नाराज झाल्याचे दिसून आले.
पंकजा मुंडे यांनी माझ्यावर धनंजय मुंडे यांना आश्रय दिल्याचे आरोप केले, त्यांना अधिक निधी दिल्याचे आरोप केले. मात्र धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे तसेच त्यांच्या वक्तव्याला विरोध करण्याचे काम आम्ही केले आहे. धनंजय मुंडे यांची ताकत वाढविण्याचे काम राष्ट्रवादीने केले आहे असेही फडणवीस यांनी सांगितले.