जळगाव। राज्यात गाजलेल्या भोसरी प्रकरणात ज्याप्रमाणे चौकशी करण्यात आली त्याचप्रमाणे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचीदेखील चौकशी करून ‘दूध का दूध पाणी का पाणी’ होऊ देत असे वक्तव्य सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी पद्मालय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले. दाउदच्या नातेवाईकाच्या लग्नात मंत्री महाजनाच्या उपस्थितीवर सहकार राज्यमंत्री पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेच्या भगवा सप्ताहाचे आयोजन जिल्ह्यात सुरु असून यानिमित्ताने सहकार राज्यमंत्र्याच्या उपस्थितीते बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ,आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपचा सहकार मोडीत काढण्याचा डाव
राज्यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसारख्या एनपीए अधिक असलेल्या जिल्हा बँका शिखर बँकेत विलीन कराव्या लागणार असून, ज्या बँकांची स्थिती चांगली आहे. त्या बँकांना शेतकर्यांना कर्ज देण्यासाठी रोकड पुरवठा राष्ट्रीयकृत बँका करीत नाही. यामुळे शेतकर्याना कर्ज देण्यास जिल्हा बँकांना अडचण निर्माण झाली आहे, सहकारी बँकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा डाव भारतीय जनता पार्टीचा असल्याचा घणाघाती आरोप सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. राष्ट्रीयकृत बँका सुटात – बुटात गेलेल्यांना उभे करणार मात्र शेतकर्यांना हाकलून लावणार याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.