बंडखोर उमेदवारांमुळे प्रचंड मनस्ताप; जिल्ह्यात भाजपा विरूध्द सेना लढाई
चेतन साखरे, जळगाव । राज्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या मातब्बर नेत्यांनाही यावेळच्या विधानसभा निवडणुकीने चांगलाच घाम फोडला आहे. भाजपा आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी केलेल्या अपक्ष उमेदवारीमुळे जिल्ह्यातील माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. किशोर पाटील, आ. हरिभाऊ जावळे आणि शिवसेनेचे माजी आ. चिमणराव पाटील यांना चक्क खिंडीतच गाठल्याने निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
केंद्रात आणि राज्यात युती असली तरी जळगाव जिल्हा त्याला नेहमीच अपवाद ठरला आहे. जळगाव जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी नावाला शिल्लक असून भाजपा विरूध्द शिवसेना असा संघर्ष नेहमीच बघायला मिळाला आहे. जिल्हा परिषद, महापालिका या निवडणुकांमध्ये देखील भाजपा विरूध्द शिवसेना अशीच लढाई झाली. या दोन्ही ठिकाणी शिवसेना ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना असा सरळ सामना होता. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपा आणि शिवसेनेने बंडखोरांना हवा देऊन ‘बी’ टीम रिंगणात उतरविल्याचे चित्र दिसून येत आहे. या दोन्ही पक्षांकडून बंडखोरांवर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. मात्र अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. या बंडखोर उमेदवारांनी आ. एकनाथराव खडसे, ना. गुलाबराव पाटील, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. किशोर पाटील, आ. हरिभाऊ जावळे, माजी आ. चिमणराव पाटील यांना खिंडीतच गाठल्याने नेत्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मुक्ताईनगरात पुन्हा संघर्ष
मुक्ताईनगर मतदारसंघात आ. एकनाथराव खडसे आणि शिवसेनेचे बंडखोर चंद्रकांत पाटील हे दोघे पारंपरिक विरोधक आहेत. खडसेंनी मतदारसंघात कुणालाही वाढू दिले नसून शिवसेनेच्या अनेक पदाधिकार्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांकडून करण्यात आला आहे. यावेळेला आ. एकनाथराव खडसे रिंगणात नसले तरी त्यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे या निवडणूक लढवित आहे. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करून चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून खडसेंना खिंडीत गाठले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या मतदारसंघातून माघार घेऊन चंद्रकांत पाटलांना पुरस्कृत करून खडसेंना घेरण्याचाच प्रयत्न केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात खडसे विरूध्द चंद्रकांत पाटील यांच्यात मोठी काट्याची लढाई होणार असल्याचे चित्र प्रचारानंतर दिसून आले आहे.
जळगाव ग्रामीणमध्ये डोकेदुखी वाढली
जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जातो. या मतदारसंघात शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर भाजपाचे नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी केली आहे. अत्तरदेंच्या या उमेदवारीला शिवसेनेचे लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर, भाजपाचे पी. सी. आबा पाटील, शिवसेनेचे माजी जि. प. उपाध्यक्ष जानकीराम पाटील आणि ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांचा उघड पाठींबा राहिला आहे. अत्तरदेंच्या बंडखोरीवरून ना. गुलाबराव पाटील यांनी मोदींच्या सभेवेळी भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर चांगलाच थयथयाट केला होता. अत्तरदेंच्या उमेदवारीने ना. गुलाबरावांची चांगलीच डोकेदुखी वाढली असून, या मतदारसंघात भाजपाविरूध्दच त्यांची लढाई असल्याचे दिसून येत आहे.
चोपड्यात सोनवणेंचे सोनवणेंना आव्हान
घरकुल घोटाळ्यात शिक्षा लागल्यामुळे शिवसेनेचे आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे हे चोपडा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर आहेत. त्यांच्या पत्नी लताताई सोनवणे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. याठिकाणी पुन्हा राष्ट्रवादीत परतलेले जगदीश वळवी हे निवडणूक लढवित आहे. तसेच भाजपाचे जिल्हा परिषदेचे सभापती प्रभाकर सोनवणे यांनी देखील बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी करून आ. प्रा. चंद्रकांत सोनवणेंसमोर चांगलेच कडवे आव्हान उभे केले आहे. तसेच प्रभाकर सोनवणे यांना शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील व काही पदाधिकार्यांचा खुला पाठींबा असल्याने या ठिकाणी शिवसेनेतच दोन गट पडले आहे. त्यामुळे या दोन्ही सोनवणेंच्या लढाईत तिसर्याचा लाभ होतो की काय? याविषयी उत्सुकता लागली आहे.
पाचोर्यात शिवसेनेसमोर महाजन समर्थकाचे आव्हान
पाचोरा मतदारसंघाचे आ. किशोर पाटील आणि भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील सख्ख्य जिल्ह्याला परिचित आहे. या दोन्हींकडून एकमेकांवर पाच वर्षात चांगलेच आरोप-प्रत्यारोप झाले आहे. त्यामुळेच की, काय या मतदारसंघात ना. महाजन यांचे कट्टर समर्थक असलेले अमोल शिंदे यांनी बंडखोरी करून आ. किशोर पाटलांसमोर आव्हान उभे केले आहे. शिंदेंची उमेदवारी ही वाघांच्या पथ्थ्यावर पडण्याची चर्चा मतदारसंघात आहे.
रावेरात चौधरींच्या उमेदवारीवरून जावळेंचा त्रागा
रावेर-यावल मतदारसंघात ना. गिरीश महाजन यांचे दुसरे समर्थक अनिल चौधरी यांनीही भाजपाचे आ. हरिभाऊ जावळेंविरोधात उमेदवारी केली आहे. चौधरींच्या उमेदवारीवरून आ. जावळेंनी चांगलाच त्रागा करून नेतृत्वाकडे तक्रारी देखील केल्या, मात्र चौधरींचे बंड ते थोपवू शकले नाही. चौधरींची उमेदवारी ही भाजपासाठी डोकेदुखी ठरत असल्याने या मतदारसंघातील निकालाकडेही लक्ष लागले आहे.
शिवसेनेचे चिमणराव पुन्हा अडकले
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या मच्छिंद्र पाटलांमुळे शिवसेनेच्या चिमणराव पाटील यांना पराभव पत्करावा लागला होता. यावेळी युती झाल्याने त्यांचा जीव काहीसा भांड्यात पडला होता. मात्र भाजपाच्या गोविंद शिरोळे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल करून चिमणरावांची चिंता चांगलीच वाढविली आहे. याठिकाणी मतविभाजनाचा फायदा कुणाला होतो हे निकालाअंती स्पष्ट होणार आहे. एकूणच जिल्ह्यातील सहा मतदारसंघांमध्ये भाजपा आणि शिवसेनेची त्यांच्याच स्वकियांशी लढाई होत असल्याने निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.