खडसे, दमानियांमध्ये पुन्हा जुंपली

0

मुंबई । माजी महसूलमंत्री आ. एकनाथराव खडसे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यात नव्याने वाद सुरू झाले आहेत. खडसे यांनी आपल्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरल्यामुळे त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप करून अटक करावी अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. तर दमानिया या मुद्दाम आपल्यामागे लागल्या असून त्यांनी पवार आणि तटकरे यांच्या तक्रारी मागे का घेतल्या? असा प्रतीप्रश्‍न खडसे यांनी केला आहे.

अटकेची मागणी
एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसाला मुक्ताईनगरमध्ये आयोजित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना खडसे यांनी आपल्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांनी खडसेंच्या कार्यक्रमाचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करून खडसेंवर विनयभंगाचा आरोप करून अटक करण्याची मागणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबतचे पत्र पाठवून अटकेचीही मागणी केली आहे.

खडसेंचा पलटवार
तर दुसरीकडे आ. एकनाथराव खडसे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दमानिया यांचे आरोप फेटाळतांना, दरवेळी फक्त मलाच टार्गेट केले जाते?, असा प्रश्न उपस्थित केला. मोपलवार यांचे प्रकरणही उघडकीस आले. त्यावेळी कथित समाजसेवक गप्प का होते? सुनील तटकरे, अजित पवारांविरोधातील याचिकेतून माघार का घेतली, असा प्रश्नही त्यांनी विचारला.