माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या सूचनेची अंमलबजावणी
मुक्ताईनगर- श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयाने यंदाच्या स्नेहसंमेलनातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले आहेत. या कार्यक्रमांवर होणारा खर्च टाळून तो शहीदांसाठी मदतनिधी म्हणून जिल्हाधिकार्यांकडे देण्यात येईल. संस्थेचे जेष्ठ संचालक तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या सूचनेनुसार महाविद्यालय प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
माजी मंत्र्यांच्या सूचनेची दखल
काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जवान शहीद झाल्याने संपूर्ण देश या घटनेने दुःखात बुडालेला आहे. या पार्श्वभूमीवर स्नेहसंमेलन रद्द करून त्यावर होणारा खर्च तसेच प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या स्वयंप्रेरणेने संकलित होणारा मदत निधी, शहीद कुटुंबियांच्या आधारासाठी देण्याचा विचार तथा सूचना आमदार एकनाथराव खडसे यांनी मांडली. त्यास संस्थेच्या चेअरमन रोहिणी खडसे-खेवलकर, सचिव डॉ.सी.एस.चौधरी तसेच सर्व संचालक मंडळ, कर्मचारी व विद्यार्थीवर्ग या सर्वांनी प्रतिसाद देऊन हा विचार कृतीत आणला, अशी माहिती प्राचार्य व्ही.आर.पाटील यांनी दिली.