कोरोनाची लक्षणे दिसल्याने डॉक्टरांकडून क्वारंटाइनचा सल्ला
जळगाव: राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने 14 दिवसानंतर ते सक्त वसुली संचालयनालय कार्यालयात हजर होणार असुन ईडीने तशी संमती दिली असल्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
भाजपाला सोडचिठ्ठी देऊन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशावेळीच खडसे यांनी ‘माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेल’ असे विधान करून खळबळ उडवुन दिली होती. दरम्यान खडसे यांचे ते विधान अवघ्या काही दिवसातच खरे ठरले असुन सक्त वसुली संचालयनालयाने खडसे यांना पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील एका भूखंडाच्या खरेदी प्रकरणी नोटीस बजावली. यापुर्वी याच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, प्राप्तिकर विभाग, झोटिंग समिती यांनी चौकशी केली होती. आता ईडीने याच प्रकरणात नोटीस दिली असुन त्यावर खुलासा देण्यासाठी दि. 30 रोजी खडसे यांना हजर राहण्यास सांगितले होते.
जिल्ह्यात समर्थकांमधून भाजपा विरोधात संताप
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही महिन्यात सक्त वसुली संचालनालयाने भोसरी येथील भूखंडप्रकरणी नोटीस बजावली आहे. खडसेंना देण्यात आलेल्या या नोटीसीचे जिल्हाभरातून पडसाद उमटत असुन ठिकठिकाणी भाजपाला जबाबदार धरीत आंदोलने केली जात आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना ईडीच्या माध्यमातून टार्गेट केले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला आहे. खडसेंना ईडीची नोटीस दिल्याने राष्ट्रवादीतर्फे निदर्शने करण्यात आली. तसेच तापी पट्ट्यातील समर्थकांनीही भाजपाविरोधात आंदोलन करून ईडीचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला आहे.
खडसेंना पुन्हा कोरोनाची लक्षणे
गेल्या महिनाभरापुर्वी खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. आता पुन्हा त्यांना ताप, कोरडा खोकला, सर्दी झाल्याने कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आली आहेत. त्यांनी तातडीने कोरोनाची चाचणी करून घेतली असुन त्याचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. वैद्यकीय अधिकार्यांच्या सल्ल्यानुसार खडसे यांना 14 दिवस क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत खडसे यांनी सक्त वसुली संचालनालयाला पत्र देऊन तसे कळविले आहे. त्यामुळे खडसे आता 30 रोजी नव्हे तर 14 दिवसानंतर ईडीसमोर हजर राहणार आहे.