संगमनेर-रावेर बसला विवरेजवळ अपघात ; प्रवासी बचावले
रावेर- खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात भरधाव ट्रक बसवर धडकून झालेल्या अपघातात बस चालक गंभीर जखमी झाल्याची घटना विवरे-रावेरदरम्यान शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात बसमधील प्रवासी सुदैवाने बचावले असले तरी बस चालक आर.एच.आशिरवाड गंभीर जखमी झाले आहेत.
रावेर आगाराच्या बसला अपघात
रावेर आगाराची संगमनेर-रावेर बस (एम.एच.40-9038) ही परतीच्या प्रवासात रावेर येत असताना विवरे-रावेरदरम्यान समोरून येणार्या भरधाव ट्रकने खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात बसला जोरदार धडक दिल्याने बसच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर बस चालक आर.एच.आशिरवाड गंभीर जखमी झाल्याने त्यांना जळगावात हलवण्यात आले. बसमधील प्रवाशांना सुदैवाने ईजा झाली नाही मात्र वाहक राठोडसह एका प्रवाशाला किरकोळ मुका मार लागल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रावेर मार्गावर अपघाताची मालिका सातत्याने सुरू असून खड्डे बुजवणार कधी? असा प्रश्न संतप्त वाहनधारक उपस्थित करीत आहेत.