खड्डा बुजवण्यात चक्क पोलिसाने घेतला पुढाकार

0

पुणे : येथील मुळा मुठा नदीपुलावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने, चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यावर वाहतूक पोलिसाने पुलावर जाऊन, रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात सिमेंटचे ब्लॉक व जवळच पडलेले डांबराचे तुकडे टाकून खड्डा बुजविला. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली.

मुंढवा येथील नदीपुलावर पालिकेने पावसाळा सुरू होण्यापूर्वी डागडुजी केली होती. परंतु रस्त्यावर काही दिवसांतच पुन्हा मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. टाकलेले डांबर निघाल्याने रस्त्यावर उंचवटे निर्माण झाले. त्यामुळे येथून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागते, त्यामुळे वाहतूककोंडी झाली होती. वाहतूक पोलिस सचिन भोसले पुलावर जाऊन याची पाहाणी केली असता सुमारे पाच फूट लांब व अर्धा फूट रूंद व खोल खड्ड्यांमुळे वाहनांना अडथळा होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी व रिक्षाचालक प्रताप दगडे यांनी मिळून पदपाथवर पडलेले सिमेंट ब्लॉक व डांबराचे तुकडे टाकून खड्डा बुजविला. त्यामुळे वाहतुक सुरळीत सुरू झाली.

येथून जड वाहनांचा जास्त वावर आहे. दुरुस्ती झाल्यावर दोन दिवसांच्या पावसातच त्याची दूरवस्था झाल्याने रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्‍न निर्माण झाला आहे. रस्त्याच्या या खड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने वाहने आदळत आहेत. तसेच दुचाकींना अपघात होत आहे. त्यामुळे पावसाने उघडीप दिल्यावर पुलावरील रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी वाहनचालकांनी केली आहे.