खड्डे चुकवितांना आता काटेरी झुडपांचाही करावा लागतो सामना

0

नवापूर (हेमंत पाटील)। शहरालगत भागातून जाणार्‍या नागपूर-सुरत महामार्ग क्रमांक सहावर काटेरी झुडपे वाढलेली आहेत.पावसाळ्यात ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहेत. वळणदार रस्ता व त्यात आजुबाजुला काटेरी झुडपे यामुळे चालकाला समोरून येणारे समोरचे वाहन दिसत नाही. आणि अपघात होत आहेत. या रस्त्यावर असलेले खड्डे चुकवितांना आता काटेरी झुडपांचाही सामना करावा लागत असुन चालक हैराण झाले आहेत. यामार्गावर रोज लहान मोठे अपघात होत आहेत. खड्डे व काटेरी झुडपे यांचा दुहेरी सामना चालकाला करावा लागत असुन वाहन चालवताना मोठी कसरत करत मार्गक्रमण करत पुढे जावे लागत आहे.

वळणावर काटेरी झुडपे जास्त
शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वळणावर काटेरी झुडपे जास्त वाढली आहे. देवळफळी भागातील वळणावर व वीज वितरण कंपनी कार्यालयाच्या पुढील भागात काटेरी झूडपी जास्त वाढल्याने समोरून येणारे वाहन चालकाला दिसत नसून रोज एकतरी लहान मोठा अपघात होत असतो. याच भागात चार वर्षापुर्वी भीषण अपघातात होऊन एकाच कुटुंबातील सहा जण ठार झाले होते.अनेक भीषण अपघात येथे होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.तरी कालांतराने येथे पाहिजे ती उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. यामहामार्गावर साईटपट्ट्या नसल्याने अपघात होतो ही बाब वेळोवेळी लक्षात आणून देखील साईटपट्ट्या बुजण्यात आलेल्या नाहीत.

अनेकांना प्राण गमवावे लागले
साईटपट्ट्यामुळे लहान मोठे अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. काटेरी झुडपे वाढल्याने अनेकांना काटेरी झुडपे लागुन जखमा होत आहेत.नवापूर शहरात ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी एसटी बसने ये जा करतात. बस पुढे मागे होतांना बसमध्ये खिडकीजवळ बसलेल्या विद्यार्थाना नकळत बांभुळ व बोरांच्या काटेरी वृक्षांच्या फांद्या लागुन चेहर्यावर ओरखडे ओढले जातात.दोन दिवसापुर्वी एकाचा डोळा थोडक्यात वाचला. यामुळे धोका अधिकच वाढला आहे.महामार्गावरील खड्डे बुजणे, दुरूस्ती करणे या बाबत अनेकदा आंदोलने, मोर्चे, अनेकदा निवेदने दिली गेली.माञ ठोस उपाययोजना अद्याप झालेली नाही.