खड्डे त्वरित न भरल्यास खड्डयातच करणार उपोषण

0

मुरबाड । मुरबाड-कल्याण क्रमांक 222 राष्ट्रीय महामार्गावरील म्हारळ ते वरप या दरम्यान सुमारे छोटे-मोठे 2760 खड्डे पडून प्रचंड प्रमाणात रस्ता नादुरुस्त झाला आहे दरवर्षी या रस्त्यावर शासनाचे लाखो रुपये खर्च केले जातात तरी या वरप-म्हारळ ते शहाड ब्रिजच्या अलीकडे मोठमोठे खड्डे पडल्याने नगर-मुरबाड वरून हजारो वाहने ये- जा करतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहने नादुरुस्त होऊन बंद पडत असल्यामुळे वाहतूककोंडीला चालकांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरील खड्डे भरताना त्या खड्डयात टाकलेली खडी, दगड, मुरुंब न काढता खड्डे भरत असल्याने वारंवार मोठमोठे खड्डे पडतात. त्यामुळे खड्डे त्वरित न भरल्यास खड्डयातच बसून उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव यांनी दिला आहे.

आंदोलनाचा इशारा
खड्डे भरण्यावेळी संबधित खात्याचे अधिकारी हजर न राहता दुर्लक्ष करतात. त्यामुळे या रस्त्यावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे भविष्यात हा रस्ता नादुरुस्त होऊ नये या साठी शहाड फाटक ते रायता पूलपर्यंत कायमस्वरूपी सिमेंट काँक्रेटचा रस्ता करण्यात यावे तसेच रस्त्यावर पडलेले छोटे- मोठे खड्डे येत्या 15 दिवसात न भरल्यास आम्हास या परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, पत्रकारांना सोबत घेऊन म्हारळ इथे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात बसावे लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव यांनी दिला आहे. या बाबत त्यांनी कार्यकारी अभियंता ठाणे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, बांधकाममंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई, स्थानिक खासदार, स्थानिक आमदार, आणि स्थानिक पोलीस, ठाणे कल्याण यांना लेखी निवेदन दिले आहे.