खड्डे दुरुस्तीसाठी बेशर्मीचे झाड लावून सेनेचे आंदोलन

0

मुक्ताईनगरातील प्रवर्तन चौकातील खड्ड्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागासह नगरपंचायतीच्या डोळेझाक भूमिकेचा निषेध ; आंदोलनस्थळी आलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांचे पुष्पहार घालत बेशर्मीचे झाड दिले भेट

मुक्ताईनगर- शहरातील प्रवर्तन चौकात ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे पाईप लाईन लिकेज दुरुस्त करताना खोदलेला खड्डा तात्पुरत्या स्वरूपात जेसीबीने माती ढकलून बुजण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला मात्र काही तासातच ही माती काही अवजड वाहनांमुळे दबली जावून अनेक अवजड व प्रवासी वाहने यात फसण्याचे प्रकार घडले होते. अपघात होवून जीवीतहानी होण्याची भीती असताना सार्वजनिक बांधकाम विभाग व पाणीपुरवठा विभाग तसेच नगरपंचायत प्रशासनाकडे तक्रार करूनही दिड महिन्यानंतरही दखल घेण्यात न आल्याने शिवसेनेने शनिवारी आक्रमक होत खड्ड्यात बेशर्मीचे झाड लावून संबंधित विभागाचे वाभाडे काढले. आगामी आठ दिवसात जर हा खड्डा पूर्ववत न झाल्यास तीव्र आंदोल छेडण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनस्थळी आलेल्या पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता यांना पुष्पहार घालून बेशर्मीचे झाड भेट देण्यात आल्याने सेनेच्या या अनोख्या आंदोलनाची दिवसभर शहरात चांगलीच चर्चा रंगली.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, तालुकाप्रमुख छोटू भोई, अ‍ॅड.मनोहर खैरनार, गोपाळ सोनवणे, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, उपतालुका प्रमुख बाळा भालशंकर, राजेंद्र तळेले, शहरप्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराळे, माजी सरपंच रामभाऊ पुनासे, जाफर अली, सलीम खान, जहीर शेख, शकुर जमादार, तालुका संघटक प्रवीण चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, शहर संघटक वसंत भलभले, नगरसेवक संतोष मराठे, युवासेना उपजिल्हा प्रमुख पवन सोनवणे, युवासेना तालुका प्रमुख पंकज राणे, संतोष माळी, दीपक खुळे, आकाश सापधरे, चेतन पाटील, किरण कोळी, स्वप्नील श्रीखंडे, अमोल भोई, शुभम तळेले, योगेश पाटील, राजू पाटील वढवा आदींसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

काँग्रेस पदाधिकार्‍यांचाही पाठिंबा
शिवसेना पदाधिकार्‍यांचे आंदोलन सुरू असताना काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील वाहनातून उतरून आंदोलनात सहभागी झाले. शिवसेनेने नागरी समस्येसाठी केलेल्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.