तळेगाव ढमढेरे । माळीमळा या रस्त्यावर औद्योगिक वसाहतीच्या दळणवळण करणार्या वाहनांची वाहतूक जास्त प्रमाणात होत असल्यामुळे रस्त्यांवर खड्डेच खड्डे होऊन खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात कित्येक अपघात झालेले आहे. हे खड्डे तातडीने बुजवावेत अन्यथा मनसे स्टाईने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष कैलास नरके यांनी दिला आहे. तळेगाव ढमढेरे ते चिमणापीर मळा या रस्तावरून कंपनी जवळ असल्यामुळे वाहतूक अधिक होत असते. या रस्त्यावर खड्ड्यांमुळे रस्ता खड्डेमय झाला असलेले चित्र पहावयास मिळत असून संबंधित बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नसल्यामुळे ही परिस्थिती ओढावत असल्याचे बोलले जाते.
अतिक्रमण काढून खड्डे बुजवण्याची मागणी
याबाबत रस्त्यावरील अतिक्रमण काढून खड्डे बुजवण्याची मागणी होत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात कंपन्या असून, मोठे गृहप्रकल्प सोसायट्यांमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे. रस्त्याच्या बाजूला असणार्या चार्या तसेच वीज, पाईपलाईन यासाठी रस्ता अनधिकृत खोदण्यात आला असून, त्यावर पाणी साचत आहे. रस्त्यावरील डांबर उखडून खड्डे पडले आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. तळेगाव ढमढेरे येथील सणसवाडी रस्ता, माळीमळा रस्ता, शेणाचामळा रस्ता, चिमणापीर मळा रस्ता याप्रमुख रस्तावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. याबाबत रस्त्यावरील अतिक्रमण काढून खड्डे बुजवण्याची मागणी होत असतानाही अपूर्ण राहिल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे शिरूर तालुकाध्यक्ष कैलास नरके यांनी दिला आहे.